Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ जुलै, २०२५

*"लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांना मरणोत्तर 'भारतरत्न' द्यावा-- खासदार -प्रणिती शिंदे, यांची केंद्र सरकारकडे मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448


नवी दिल्ली / सोलापूर –

भारतीय संविधानातील समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे मूर्त स्वरूप ठरलेले क्रांतिकारी लोकशाहीर, विचारवंत, साहित्यिक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा, अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. खासदार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांना यासंदर्भात पत्र पाठवून हा विषय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित समितीकडे मांडण्याचे आवाहन केले आहे.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम होते. त्यांनी आपल्या शाहिरी, लेखन, लोकनाट्य आणि कथनशैलीद्वारे सामाजिक क्रांतीचा दीप पेटवला. ‘फकिरा’, ‘झुंड’, वारणेचा वाघ, ‘माझी मैना’ यासारख्या त्यांच्या साहित्य संपदा आजही शोषित, वंचित आणि श्रमिक वर्गासाठी प्रेरणादायी ठरतात.


अण्णाभाऊ साठे यांनी मोजकेच औपचारिक शिक्षण घेतले असतानाही ३५ कादंबऱ्या, १३ लोकनाट्य, ७ चित्रपटांच्या कथा, प्रवासवर्णन, कविता संग्रह, पोवाडे आणि अनेक शाहिरी रचना केली. त्यांच्या साहित्याचे २७ देशांमध्ये अनुवाद झाले असून विशेषत: रशियन ग्रंथालयांमध्ये त्यांच्या साहित्याला मानाचे स्थान आहे. तसेच अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती ‘शिवाजी महाराजांचे गड किल्ले’ या विषयावर पोवाडा सुद्धा रचला आहे. ते केवळ साहित्यिकच नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय होते. त्यांनी श्रमिक आणि कष्टकरी समाजासाठी आपल्या लेखणीने न्यायाचा आवाज बुलंद केला असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रातून अधोरेखित केले. 





खासदार शिंदे म्हणाल्या की, “अण्णाभाऊ साठे यांचे कार्य भारतीय संविधानाच्या मूल्यांशी सुसंगत आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न देणे हे केवळ योग्यच नव्हे, तर न्याय्यही ठरेल. महाराष्ट्रासह देशभरात त्यांच्या कार्याचे व विचारांचे महत्व आहे. केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.” अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची ही मागणी महाराष्ट्रासाठी, विशेषतः मागासवर्गीय, श्रमिक, वंचित वर्गासाठी अभिमानास्पद ठरेल, असेही खासदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा