*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सोलापूर : अंमली पदार्थाच्या रॅकेटचं जाळं आणि त्यावरील कारवाईचं प्रकरण मराठवाड्यासह धाराशीव जिल्ह्यात गाजत असतानाचं सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रोन पुरवठा आणि विक्रीच्या साखळीत शेजारच्या कर्नाटकातील ' त्रिकुटा ' सह 08 जणांना गजाआड केलंय. या टोळीतील परप्रांतीय ' चौकडी ' चा पाठलाग करून त्यांच्या झाडाझडतीत 18 ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आलं आहे.
जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या रॅकेटसंबंधी अधिक माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशीत केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सोलापूर जिल्ह्यात मेफेड्रोनचा पुरवठा कोठून होतो, तो करणारे कोण आहेत, याच्या मागावर होते.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांना पुणेहून सोलापूरकडे येणारी KA05/MX2942 या वाहनातून 04 इसम हे अंमली पदार्थ मेफेड्रोन (MD) हे घेऊन सोलापूरच्या दिशने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
ही माहिती वरिष्ठांना कळवून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकणी पाटीजवळ पुणेकडून येणाऱ्या वाहनांवर लक्ष देऊन थांबले होते.
सायंकाळी 05 वा. च्या सुमारास त्या वर्णनाची कार पुणेकडून येत असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने त्या वाहनास इशारा करून थांबण्यास सांगितले असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी पथकाने कारचा पाठलाग करून ती कार ही सिमको ब्रिजवर थांबवली. त्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये मोहसीन इस्माईल शेख (वय-33 वर्ष, रा. कुमारस्वामी नगर मस्जीदजवळ शेळगी), याकूब अली बागवान (वय-51 वर्ष, रा 04/11 मम्मतपुरा जिल्हा कलबुर्गी), मोहम्मद मतीन हाजी शेख (वय- 49 वर्ष, रा. 41/1/90 दर्गारोड घट्टेवाडी, मोमनपुरा, कलबुर्गी) आणि बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान (वय-37 वर्षे रा. 06-322/7 बटली अलावा, मोमीनपुरा कलबुर्गी) ही चौकडी मिळून आली आहे.
त्या कारच्या झडतीत, कारच्या पाठीमागील डिकीमध्ये स्पेअर व्हीलच्या जवळ 18 ग्रॅम मेफेड्रोन मिळून आले. ते मेफेड्रोन हे पंचनामा करून जप्त करण्यात आले. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 08 (क), 22 (ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भिमगोंडा पाटील या गुन्ह्याचा तपास करीत होते.
*या गुन्ह्याच्या तपासात ही ' चौकडी '*
सोलापूर शहरातील मुजफ्फर अब्दुल जब्बार शेख (वय- 31 वर्षे, रा. 31 गणेश पेठ, हिंगुलांबिका मंदिर, सोलापूर), इरफान इस्माईल शेख (वय-22 वर्ष, रा. कुमारस्वामी नगर. मस्जीद जवळ शेळगी), मुबारक राजअहमद शेख (वय-32 वर्ष, रा. आदर्श नगर, शेळगी) आणि अस्लम महम्मद युसुफ बागवान (वय-45 वर्षे, ई डब्लु एस प्लॉट नं 03 विडी घरकुल, हैद्राबाद रोड, सोलापूर) यांच्यामार्फत शहर व जिल्ह्यातील लोकांना मेफेड्रोन ची विक्री करत असल्याचे निष्पन्न झालं असून त्यांनाही या अटक करण्यात आली आहे.
या आरोपींकडून ते मेफेड्रोन हे कोठून आणले, ते कोठे तयार करण्यात आले आहे, याबाबत तपास सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्था.गु.शा. सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपक भिंताडे (सायबर पोलीस ठाणे) व स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि विशाल वायकर, भिमगोंडा पाटील, पोउपनि सुरज निंबाळकर, श्रीकांत गायकवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार यांनी पार पाडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा