*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी येत्या १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ, २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
३ ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, ४ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रत्येक मंडळनिहाय राबविणे, ५ ऑगस्ट रोजी विशेष साहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरणय (डीबीटी) न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे, ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व ती अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे आणि ७ ऑगस्ट रोजी एम-सँड (M-Sand) धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे याबाबत कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य घ्यावे
माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने शासनाच्या विविध योजनांची, ध्येय धोरणांची सकारात्मक प्रसिद्धी करण्यात येते. महसूल सप्ताहाच्या ठळक आणि प्रभावी प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य घ्यावे. सप्ताहात आयोजित कार्यक्रमांची माहिती नागरिकांनी व्हावी याकरिता कार्यक्रमापूर्वी व्यापक प्रसिद्धी द्यावी. सर्व तालुका, उपविभागीय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती फ्लेक्स बॅनर्सद्वारे ठळकपणे प्रदर्शित करावी अशा सूचनाही श्री. डूडी यांनी दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा