Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

गझलेतून मांडलेली समरसतेची हाक — सतिश मालवे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

 


*उपसंपादक -नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

🎖️ ‘एक पक्षी’ गझलसंग्रहास समरसता साहित्य पुरस्कार 

 


मराठी गझलविश्वात सामाजिक समरसतेचा सुर गझलेतून प्रभावीपणे उमटवणाऱ्या सतिश गुलाबसिंह मालवे यांच्या ‘एक पक्षी’ या गझलसंग्रहास समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र तर्फे दिला जाणारा ‘समरसता साहित्य पुरस्कार २०२५’ नुकताच नांदेड येथे दिनांक २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झालेल्या २०व्या समरसता साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.


राज्यभरातील शेकडो साहित्य कृतींपैकी या संग्रहाची निवड करण्यात आली असून परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले की, “समरसता, सामाजिक जागरूकता आणि संवेदनशील लेखन यांचे प्रतीक ठरणाऱ्या या गझलसंग्रहाची निवड ही विशेषत्वाने करण्यात आली आहे.”


मुऱ्हा देवी (ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) येथील आणि सध्या शिक्रापूर (जि. पुणे) येथे वास्तव्यास असलेले सतिश मालवे, साहित्यजगतात ‘सतिशसिंह’ या नावानेही परिचित आहेत. त्यांच्या गझलेत गावाची माया , आदिम संस्कृतीचा ठसा, मातीतली भावनिक समृद्धी आणि समाजभान यांचे प्रभावी दर्शन घडते.


या संमेलनात विशेष गझलसत्राचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच सत्रात सतिश मालवे यांनी आपल्या सशक्त गझल सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. सभागृहात टाळ्यांचा निनाद झाला तेव्हा खालील काही शेर वातावरणात घुमत होते


असावी रात्र एखादी जिवाच्या आत माझ्या,

जळत आहेत स्वप्नांचे दिवे डोळ्यात माझ्या


 मला नाचायचे नाहीच तालावर कुणाच्या,

उगाचच घुंगरू बांधू नका पायात माझ्या


जमू शकणार रोपांना अता मातीत रुजणे,

नभाने कार्यशाळा घेतली शेतात माझ्या


या ओळींनी रसिक श्रोत्यांना अंतर्मुख केले. त्यानंतर


माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही,

समजू नका तरीही मी कास्तकार नाही



या सामाजिक वास्तव टिपणाऱ्या शेराने सभागृहात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.


‘एक पक्षी’ हा गझलसंग्रह केवळ शायरीचा आस्वाद नाही, तर तो एका काळाची, समाजाची आणि व्यक्तीच्या अस्तित्वाची जाणीव देतो.


या पुरस्काराच्या निमित्ताने सतिश मालवे यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “मराठी गझलला समरसतेचा सूर देणाऱ्या नव्या पिढीतील प्रगल्भ शायर म्हणून सतिश मालवे यांचे योगदान लक्षणीय आहे.”

1 टिप्पणी: