Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५

वीर सरदार मालोजीराजे गढी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावर हिंगणगाव येथे भर उन्हात रस्ता रोको आंदोलन

 


कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

-----छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीर सरदार मालोजीराजे यांची इंदापूर येथील गढी अतिक्रमण मुक्त करावी, त्यांची समाधी शोधून त्याचे संवर्धन करावे, त्यासाठी आराखड्यात योग्य बदल करावेत या प्रमुख मागण्यासाठी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे भर उन्हात सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली एक तासाहून जास्त काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता रोको आंदोलनानंतर पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी यासंदर्भात सर्वसमावेशक बैठक घेऊन हा प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावण्याची ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली. 

हिंगणगाव येथे आंदोलन प्रसंगी आमदार महेश लांडगे म्हणाले, वीर सरदार मालोजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा वारसा संवर्धन करण्यासाठी आम्ही आंदोलन केले. यापूर्वी देखील मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले मात्र प्रशासनाने त्यांची दिशाभूल केली. मात्र आता दिशाभूल चालणार नाही. मालोजीराजे गढी आराखड्यात योग्य बदल होणे गरजेचे असून त्यासाठी आमच्या माणसांना सोबत घेणे गरजेचे आहे. मी पिंपरी चिंचवड येथे ९४० क्षेत्र २५० जेसीबी, १०० पोकलेन लावून सपाट केलेला माणूस असून प्रशासनाने माझी नीट माहिती घ्यावी. मी मतदान मिळवण्यासाठी आंदोलनात उतरलो नसून आमची अस्मिता जपण्यासाठी उतरलो आहे. पोलीसांनी कार्यकर्त्यांचे पत्ते, फोन नंबर घेतले असले तरी तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तर फक्त माझ्यावर करा असे सूतोवाच त्यांनी केले.

यावेळी शिवभक्त अनिल देवळे महाराज, सोनाई दूध संघाचे संचालक तथा माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, महेश बोधले महाराज, प्रेमकुमार जगताप यांची भाषणे झाली. 

यावेळी बाबासाहेब चवरे, सदानंद शिरदाळे, माऊली चवरे, पवनराजे घोगरे, प्रवीण पवार, किरण गानबोटे, राजकुमार जठार, राम आसबे, तेजस देवकाते, भारत जामदार, धीरज शहा, तानाजी देशमुख उपस्थित होते. 

वीरश्री मालोजीराजे भोसले यांना इंदापूर मध्ये वीरमरण आले.

सध्या मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या सुशोभीकरणाचे काम राज्य सरकारकडून सुरू असून जोपर्यंत मालोजीराजे यांचे समाधीस्थळ सापडत नाही, तोपर्यंत चालू असणारं सुशोभीकरण काम थांबवण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांसह शेकडो शिवभक्तांनी लावून धरली होती अखेर प्रशासनाने नमते घेत चालू असणारे काम थांबवण्याचे आदेश तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिल्यानंतर शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेवून त्यांना निवेदन दिले. भगव्या टोप्या परिधान केलेल्या आंदोलकापेक्षा पोलिसांची संख्या जास्त होती. केंद्र व राज्यात भाजप प्रणित सरकार असताना देखील भाजप च्या तीन आमदारांनी मालोजीराजे गढी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले हे विशेष आहे. त्यामुळे सरकार व प्रशासनापुढे हा संवेदनशील प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान आहे.




दरम्यान तहसीलदार जीवन बनसोडे, नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजीराजे गढी वरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली. यासंदर्भात प्रशासनाने १४ कुटुंब प्रमुख यांना अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते पैकी ४ जणांचे अतिक्रमण हटविण्यात आले असून एकाने वैद्यकीय कारणासाठी स्टे घेतला असून अतिक्रमण हटविण्याची प्रकिया जोरात सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा