कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
-----इंदापूरच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण व आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने इंदापूर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या आत्याधुनिकरणासाठी तब्बल ५५ कोटी १६ लाख रुपयांचा निधी शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असून, हा निधी क्रीडा खात्याचे माजी मंत्री तसेच नूतन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार, दि. ६ ऑगस्ट रोजी ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली. या निर्णयामुळे इंदापूर व परिसरातील खेळाडूंना प्रचंड संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारा टप्पा ठरणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी भक्कम मंच उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉलसाठी नैसर्गिक गवताचे मैदान, व्हॉलीबॉलचे सिंथेटिक कोर्ट, विविध खेळांचे इनडोअर हॉल, फ्लड लाईट्सची सुविधा, मुले व मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहे, व्यायामशाळा व आधुनिक क्रीडा साहित्य, स्वतंत्र बॅडमिंटन हॉल, ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना पवेलियन, शूटिंग रेंज, स्क्वॉश कोर्ट, क्लब हाऊस, व्हीआयपी कॉन्फरन्स हॉल, सुंदर लँडस्केपिंग, पाणीपुरवठा आणि सौरऊर्जा प्रणाली यांसारख्या सुविधांचे आत्याधुनिकरण करण्यात येणार आहे.
इंदापूरचा गौरव वाढणार -
या संकुलामुळे केवळ प्रशिक्षणच नव्हे तर निवास, आरोग्य, सुरक्षितता आणि पोषणाच्या दृष्टीनेही खेळाडूंना सर्व सुविधा एका ठिकाणी मिळणार आहेत. यामुळे खेळाडूंचा वेळ, श्रम आणि खर्च वाचून त्यांचे लक्ष खेळावर केंद्रित राहील, याचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम त्यांच्या कौशल्यवृद्धीवर आणि स्पर्धात्मक यशावर निश्चितच दिसून येतील, इंदापूर तालुक्याने यापूर्वीही अनेक गुणवंत क्रीडापटू घडवले आहेत. आता हे संकुल सुरू झाल्यानंतर या भागातून अधिकाधिक खेळाडू जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. शासनाच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे इंदापूरचा गौरव वाढणार असून, या भागाचा क्रीडा नकाशावर ठसा उमटणार आहे.
दर्जदार सुविधा उपलब्ध :-
या संपूर्ण क्रीडा संकुलाच्या आत्याधुनिकरणातून ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाई दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील आणि या भागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यास मदत होईल, असे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा