कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
पुणे परीसर व घाट माथ्यावरील पावसाचे व धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे. तसेच दौंड येथून उजनीत १ लाख ७६ हजार क्युसेक्सचा विसर्ग येत आहे. त्यामुळे उजनी धरणातून भिमा नदी पात्रात सायंकाळी साडेपाच वाजता १ लाख ५१ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे. तर नदी काठावरील पिकात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गणेशवाडी पुलावर दहा फूट पाणी वाहत असल्याने पुलावरील वाहतुक दुसऱ्या दिवशीही बंद ठेवली आहे.
पुणे परिसर व घाट माथ्यावरील पावसामुळे २६ पैकी जवळपास २२ धरणे भरल्याने त्यातील पाणी खाली सोडले जात आहे. त्यामुळे दौंड येथून उजनी धरणात १ लाख ७६ हजार क्युसेक्सचा विसर्ग येवून मिसळत आहे. तर उजनी धरणात ११८ टिएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास १०३ टक्के भरले आहे. पुरनियंत्रणाच्या दृष्टीकोनातून उजनी धरणातून काल रात्री नऊ वाजता १ लाख २५ हजार क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आला. त्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता वाढ करून १ लाख ३० हजार क्युसेक्स करण्यात आला. त्यामध्ये सकाळी दहा वाजता १ लाख ४० हजार क्युसेक्स करण्यात आला आहे.
परंतू दौंडवरून येणाऱ्या पाण्यामुळे भिमा नदीची पुरपरस्थिती बिकट होऊ नये म्हणून सायंकाळी साडेपाच वाजता त्यामध्ये वाढ करून १ लाख ५१ हजार क्युसेक्स करण्यात आले आहे. तर नीरा नदीचे पाणी कमी करून २० हजार क्युसेक्स करण्यात आले आहे. त्यामुळे नरसिंहपूर येथील संगमावर १ लाख ७१ हजार क्युसेक्स पाणी वाहत आहे.
भिमा नदी काठावरील इंदापूर व माढा तालुक्यातील गावातील शेतात पुराचे पाणी घुसल्याने ऊस, केळी, मका, कडवळ, पेरू पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर मोटारी, पाईप, स्टार्टर, प्लास्टिक पिंप, फ्युज पेट्याही पुराच्या पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने पिकांचे व इतर साहित्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
भिमा नदीवरील गणेशवाडी - गारअकोले पुल काल पासून पाण्याखाली गेला असून पुन्हा नदीत पाणी वाढविल्याने पुलावर जवळपास दहा ते बारा फुट पाणी वाहत आहे. त्यामुळे यावरील वाहतूक आज दुसऱ्या दिवशीही बंदच ठेवण्यात आली आहे. तर भांडगाव, टणू, नरसिंहपूर येथील कोल्हापूरी पध्दतीचे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. नरसिंहपूर येथील भिमा व नीरा नदी वरील पुलाला पुराचे पाणी टेकले असल्याने त्याला बघण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे. प्रशासनाच्या वतीने कोणीही अद्यापही भेटी दिल्या नाहीत. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
फोटो - गणेशवाडी येथील पुलावरून दहा फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा