इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या सन १९७२ च्या जुन्या अकरावीच्या वर्ग मित्र मैत्रिणी यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी शाळेतील आठवणींनी सर्वजण भावनिक झाले होते. स्नेह मेळाव्याचे आयोजन मच्छिंद्र शेटे, दत्ता कुंभार, सुहास जवंजाळ, दयानंद ठाकूरदास, बळीराम मोरे, शाळीग्राम काळे यांनी केले होते. यावेळी दत्ता कुंभार यांनी सादर केलेले तुझे आहे तुझ पाशी या नाटकातला प्रसंग, लता गारटकर यांनी गायलेले भावगीत तसेच डॉ. मधुकर मोकाशी यांनी लिहिलेली अनेक पुस्तके विद्यालयासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय सोरटे सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. हे सर्व स्नेहमेळाव्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
मेळाव्याची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाल्या नंतर गोरक्षनाथ ठोंबरे सर, अंजली आगलावे मॅडम, दत्तात्रय गुजर सर, लक्ष्मण जाधव सर आणि विद्यालयाचे प्राचार्य संजय सोरटे सर या गुरुजनांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
यावेळी ५३ वर्षाच्या कालखंडानंतर सगळे एकत्र आल्यानंतर शाळेची प्रगती पाहून सर्वजण आनंदी झाले.
स्नेहमेळाव्यात मनोगत व्यक्त करताना श्री. शेटे सर म्हणाले, या ५३ वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक शिक्षक आणि अनेक मित्र-मैत्रिणी आपल्याला कायमच्या सोडून गेले मात्र शिक्षकांचे संस्कार आणि मित्र मैत्रिणींचे, वर्ग बंधू भगिनींचे नाते याची आठवण प्रत्येकाने ठेवली आहे. त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यावेळी मरण पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्री. शेटे सर पुढे म्हणाले, आपल्या शालेय जीवनात बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड वाढदिवस असले प्रकार नव्हते. वर्गातल्या मुलींच्या कडे पाहायला सुद्धा संकोच वाटायचा अगदी गल्लीत राहणारी असली तरी ती घरी आल्यावर किंवा आपण तिच्या घरी गेल्यावरच औपचारिक बोलणे व्हायचं. आता काळ बदललाय. आपण जुन्या पिढीमध्ये वावरलो तसे आताच्या पिढी बरोबरही ऍडजेस्ट झालो. आपल्या वर्गातल्या बऱ्याच जणांकडे अद्याप स्मार्ट मोबाईल नाहीत. बऱ्याच जणांच्याकडे साधे मोबाईल आहेत. मोबाईल उचलणे व ठराविक नंबरला मोबाईल करणे एवढेच माहीत असणारी आपली ही पिढी आहे. अशा परिस्थितीत आम्ही जास्तीत जास्त लोकांना संपर्क करून हा स्नेहमेळावा यशस्वी केला आहे. स्नेह मेळावा म्हणजे टॉनिक असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर प्रत्येकाने आपल्या विद्यालयातील आठवणी विशद करत अकरावी नंतर आज पर्यंतचा प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड मनोहर चौधरी म्हणाले, माननीय कै. शंकरराव पाटील यांच्यापासून आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पर्यंत संस्थेने केलेल्या चौफेर प्रगतीची माहिती सविस्तरपणे दिली. शेवटी लता देशपांडे यांचे बरोबर सर्वानी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. स्नेहमेळाव्या
साठी सर्जेराव शेंडे, प्राध्यापक आनंदमूर्ति गोसावी, डॉ. मधुकर मोकाशी, सोपानराव भोंग, वसंत उंबरदंड, रामचंद्र फलफले, दिलीप पाचनकर, अशोक पवार गणपत शिंदे, विठ्ठल वाघ, नटवरलाल गुजर, बापू कोतमिरे, तुकाराम बनकर, किसन देवकर, शशिकांत घोडके, भगवान देवकर, लता देशपांडे पूर्वाश्रमीच्या उल्का कुलकर्णी, सुनंदा जोशी, आशालता गारटकर, नसीम पठाण, चंदा खुळे इत्यादी उपस्थित होते. शेवटी परत भेटण्याची इच्छा व्यक्त करून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. आभार प्रदर्शन प्रा. आनंद मूर्ति गोसावी यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा