इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर अर्बन बँकेस सलग दोन वर्ष अ वर्ग लेखा परीक्षण, बँके कडून सभासदांना इंद्दापूर अर्बन बँकेने सलग दोन वर्ष अ वर्ग लेखापरीक्षण संपादन केले असून सभासदांना १० टक्के लाभांश देण्यासाठी ६४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे बँकेस तुम्हा सर्वांच्या सहकार्याने तसेच संचालक मंडळाच्या प्रयत्नाने पुन्हा चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा बँकेचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर अर्बन सहकारी
बँकेच्या सभागृहात शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व बँकेचे अध्यक्ष सत्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, बँकेच्या पिंपरी चिंचवड, गुलटेकडी पुणे, लोणी काळभोर, टेंभुर्णी, नातेपुते या पाच ठिकाणी शाखांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे दिला असून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या परिसरातील युवा उद्योजक, युवती व महिला, व्यापारी व्यावसायिकांना व्यवसायासाठी मदत करून त्यांचे सक्षमीकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ज्यांनी अडचणीच्या काळात बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यांनी जाणीव ठेवून बँकेचे कर्ज त्वरित फेडावे असे आवाहन त्यांनी केले. बँकेचे अध्यक्ष सत्यशील पाटील म्हणाले, माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ आणि माजी आमदार राजेंद्रकुमार घोलप उर्फ तात्या यांच्या
मार्गदर्शनाखाली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १० सप्टेंबर १९९७ रोजी बँकेची स्थापना केली. बँकेचे ६५७८ सभासद असून बँकेचा राखीव निधी देखील ३२३१.१८ लाख इतका झाला असून सदर वाढीचे प्रमाण १६.७७ टक्के आहे. जुलै अखेर बँकेच्या १२७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. पारदर्शी कारभार व तत्पर सेवेमुळे बँकेने सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक असा नावलौकिक संपादन केला आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी लेखापरीक्षण अहवाल वाचन केले. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष मनोज मोरे, संचालक संदीप गुळवे, ॲड विकास देवकर, लालासाहेब सपकळ, भागवत पिसे, अविनाश कोतमिरे, मच्छिंद्र शेटे, गोविंद रणवरे, स्वप्निल सावंत, संजय जगताप, सुभाष बोंगाणे, डॉ. मिलिंद खाडे, संजय रायसोनी, डॉ. अश्विनी अभिजित ठोंबरे, डॉ. दिपाली खबाले, ॲड. विजय पांढरे, ॲड. माधव शितोळे, ॲड. गिरीश शहा, प्रशांत भिसे तसेच अविनाश घोलप, विलासराव वाघमोडे, शेखर पाटील, सुरेश मेहेर, किशोर पवार, गोरख आदलिंग यांच्यासह बँकेचे सभासद उपस्थित होते.
सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले तर स्वागत व आभार बँकेचे उपाध्यक्ष मनोज मोरे यांनी मानले.
*सभेत आला मोबाईलवर संदेश*
इंदापूर बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दहा टक्के लाभांश जाहीर केल्यानंतर काही क्षणात सर्व सभासदांना लाभांश रक्कम बँकेच्या खात्यात जमा झाल्याचा संदेश मोबाईलवर आला. यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. बँकेस अच्छे दिन आल्याबद्दल सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा