इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
खडकी एज्युकेशन सोसायटीचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य आणि विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालयास गुजरातमधील शासकीय कला महाविद्यालय रानवाव, पोरबंदर आणि शासकीय कला महाविद्यालय अमीरगड या दोन शासकीय महाविद्यालयांच्या शिष्टमंडळाने शैक्षणिक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली. या शिष्टमंडळात दोन्ही शासकीय महाविद्यालया चे प्राचार्य आर. बी. जोशी, नयनकुमार सोनारा यांच्या सह सहाय्यक प्राध्यापक एम. ए. पटेल, आर. जे. परमार, आर. के. कोडीयातर, जयकुमार बुद्धदेव, फराहीना शेख, वर्षा चौधरी यांचा समावेश होता. टी. जे. महाविद्यालयाने मिळवलेली नॅक 'अ' श्रेणी, स्वायत्त दर्जा, संशोधनातील वैवीध्य पुर्ण कार्य, नवनवीन उपक्रम, पेटंट व क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य अभ्यास पाहणीसाठी हे शिष्टमंडळ विशेष भेटीवर आले होते.
या शिष्टमंडळाने महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील प्रत्येक विभागाची पाहणी करून अध्ययन -अध्यापन पद्धती, संशोधन उपक्रम, पेटंट कार्य, बेस्ट प्रॅक्टिसेस यांचा आढावा घेतला. तसेच एन एस डी सी कौशल्य विकास केंद्र, रेडिओ टीजे 89.6, एफ.एम., शूटिंग रेंज, ग्रंथालय, एन एस एस, एन सी सी, क्रीडा विभाग, ऑफिस या सर्व विभागांना भेटी देऊन सर्व माहिती जाणून घेत त्यांनी प्रत्येक विभागाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. आजची ही भेट आम्हा सर्वांसाठी संस्मरणीय ठरली असल्याचे सर्व सदस्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल या शिष्टमंडळास शुभेच्छा देताना म्हणाले, गुजरात हून आलेल्या शासकीय महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने टी. जे. महाविद्यालयाची केलेली निवड आम्हा प्रत्येकासाठी अभिमान व गौरवाची बाब आहे. या अभ्यासदौऱ्यामुळे शैक्षणिक देवाणघेवाण अधिक दृढ होईल, नव्या संधी उपलब्ध होतील, टी. जे. महाविद्यालयाचे उपक्रम देशपातळीवर आदर्शवत ठरतील.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोगशील उपक्रम, संशोधन व सामाजिक बांधिलकी हीच टी. जे. महाविद्यालयाची खरी ओळख आहे. शैक्षणिक देवाणघेवाण ही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम बनवते. गुजरात सारख्या आपल्या राज्या बाहेरील दोन शासकीय महाविद्यालयाचे शिष्टमंडळ आपल्या महाविद्यालय भेटीसाठी येते आहे हे आपल्या साठी जसे गौरवाची बाब असली तरी आपली जबाबदारी इथून पुढे निश्चितपणे वाढली आहे. अजून आपल्याला खूप काही करायचे आहे. याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने गुणवता वृद्धिंगत करण्यासाठी कायम सज्ज राहिले पाहिजे.या अभ्यास दौऱ्यामुळे दोन राज्यांतील महाविद्यालयांमध्ये परस्पर सहकार्य व नवे शैक्षणिक प्रयोगांची देवाणघेवाण होईल. असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, सदस्य रमेश अवस्थे व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
शिष्टमंडळातील प्राचार्य आर.बी.जोशी, प्राचार्य जयकुमार बुद्धदेव यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. टी. जे. महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण, संशोधन कार्य, नवनवीन उपक्रम व गुणवत्तापूर्ण अध्यापन खरोखरच अनुकरणीय आहे. प्राचार्य, प्राध्यापक व संस्थाचालक यांच्या प्रयत्नांमुळे हे महाविद्यालय देशातील इतर महाविद्यालयांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आम्ही सर्वजण अक्षरशः भारावून गेलो असून आम्ही आमच्या महाविद्यालयात हे सर्व उपक्रम राबवू. आपण सर्वजण आमच्या महाविद्यालयास भेट देण्यासाठी आवर्जून या असे प्राचार्य श्री. जोशी व बुद्धदेव यांनी प्राचार्य डॉ. चाकणे यांना
निमंत्रण दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक प्रा. गौरी मातेकर यांनी करून देताना त्यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाची ओळख करून दिली. यावेळी उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक श्री.डामसे, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. सुचिता दळवी यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लेले यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा