अकलूज ---प्रतिनिधी
शकूरभाई. तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात ‘शिक्षक दिन’ सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांच्या शुभहस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे व सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत, बलभीम काकुळे, कल्पना मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अतिशय नेटके आयोजन विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. चि. शाहूराजे इंगोले याने प्रास्ताविक करून शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व विभागाच्या शिक्षक-शिक्षकेत्तरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर विद्यार्थिनी कु.अर्शीया शेख व प्रांजली मिसाळ या विद्यार्थिनींनी शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना मनोगतातून व्यक्त करताना गुरुजनांविषयीचा आदर, कृतज्ञता व प्रेरणा स्पष्टपणे जाणवत होती.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयात १२ वी वाणिज्य च्या विद्यार्थ्यांनी खास शिक्षकांप्रती लिहलेल्या लेखांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन, चित्रकला व सर्जनशीलतेला योग्य वाव मिळाला. तसेच विद्यार्थिनी गौरी उबाळे हिने तिच्या सुमधुर आवाजात ‘गुरुवर तो ज्ञान के सागर है’ हे शिक्षक गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी ‘शिक्षक दिन’ आयोजन करण्याचा उद्देश सांगून याचे महत्व विषद करताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची, त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. डॉ. राधाकृष्णन यांच्या अलौकिक कार्याने एक शिक्षक ते देशाचे राष्ट्रपती या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशातील आदर्श नागरिक घडविण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान बहुमोल असून त्यांचे मोल जीवनात महत्वाचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभूराजे गिड्डे याने केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रतिभा ठोंबरे हिने आभारप्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या सहभागामुळे शिक्षक दिन सोहळा संस्मरणीय ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा