Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

वादविवाद स्पर्धेतील आजचे विद्यार्थी म्हणजे भविष्यातील वक्ते-- ॲड-शीतल चव्हाण


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन व जिल्हा परिषद हायस्कूल, उमरगा यांच्या वतीने दि. 04 (गुरुवार) रोजी आयोजित "प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वादविवाद स्पर्धे"ला उमरगा तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. "आजच्या शिक्षण व्यवस्थेतून मानवी मूल्ये रुजत आहेत/नाहीत" हा या वादविवाद स्पर्धेचा विषय होता. या वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन उमरगा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अमोल राजपूत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे आयोजक ऍड. शीतल चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, स्पर्धेचे परीक्षक राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक कमलाकर भोसले, प्रा. डॉ.पसरकल्ले सर, शीतल जावळे उपस्थित होत्या. 

यावेळी पुढे बोलताना ऍड. शीतल चव्हाण म्हणाले की, वादविवाद स्पर्धेतून भविष्यातील मोठे वक्ते तयार होतात. अनेक विद्यार्थ्यांना आज मोबाईल व डान्स सोडले तर चित्रकला, संगीत व वक्तृत्व अशा स्पर्धेमध्ये रुची राहिलेली नाही. पण अशा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. कारण, विद्यार्थी दशेमध्ये जर विद्यार्थी स्टेजवर येऊन आपले विचार ठामपणे मांडत असतील तर ते भविष्यातील मोठे वक्ते होऊ शकतात, तसेच विविध क्षेत्रात यश मिळवू शकतात. 



यावेळी गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत यांनी विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले. स्पर्धेत तालुक्यातील एकूण 13 शाळेच्या संघांनी, म्हणजेच एकून 26 विद्यार्थ्यांनी, सहभाग नोंदवला. यात महात्मा गांधी विद्यालय, केसर जवळगा शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. त्या संघाला 2100 रुपयाचे रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देण्यात आले. द्वितीय क्रमांक भारत विद्यालय, उमरगा या शाळेने पटकावला. या शाळेला 1500 रुपयाचे रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या उमरग्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलला 1100 रुपयाचे रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्व सहभागी शाळेंना स्मृतीचिन्ह, भारताच्या संविधानाची उद्देशिका व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील धनराज तेलंग, विद्यानंद सुत्रावे, बशीर शेख, सदानंद कुंभार, ममता गायकवाड, सोनाली मुसळे, वर्षाराणी पाटील, शिल्पा चंदनशिवे तर ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, किशोर बसुगुंडे, प्रदीप मोरे, प्रदीप चौधरी, ऍड. अर्चनाताई जाधव यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता उपासे, प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे व आभार शिल्पा चंदनशिवे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा