इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने बसविलेल्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची आरती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष तथा माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी संस्थेच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विविध क्षेत्रांतील कार्याचा सखोल आढावा घेत संस्थेच्या प्रत्येक विभागाला भेट देऊन सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी संस्थेमार्फत दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या ‘संवाद’ या माहितीपत्रिकेच्या ऑगस्ट २०२५ महिन्याच्या अंकाचे प्रकाशन श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या उपक्रमांचे सातत्य, त्यांची व्यापकता आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम पाहून श्री. पाटील यांनी संस्थेचे मनापासून कौतुक केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर व विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे, ‘मोबाईल व्यसनमुक्ती’ ची संकल्पना राबवित आहे. या संकल्पना निश्चित वस्तुनिष्ठ व कौतुकास्पद आहेत. "मोबाईलचे व्यसन हा आजच्या तरुण पिढीपुढील एक गंभीर आणि ज्वलंत प्रश्न आहे." या व्यसनामुळे शैक्षणिक प्रगती सोबतच मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर देखील दुष्परिणाम होत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. यावर जनजागृती करण्याची गरज व्यक्त करत त्यांनी संस्थेच्या या उपक्रमाला ‘काळाची गरज’ म्हटले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अरविंद गारटकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण, कोपीवरची शाळा प्रमुख भारत बोराटे, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई अत्तार, इन्चार्ज दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी सागर कांबळे, जावेद हबीब विभाग प्रमुख अमोल राऊत आणि फॅशन विभाग प्रमुख सौ. त्रिशला पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी रोहिणी जाधव, केदार गोसावी, मानसी पाटील यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा