इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर येथील श्री गुरु नामदेव आण्णा माळी ( वसेकर) पुण्यतिथी उत्सव समितीच्या वतीने रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषात व टाळ मृदुंग,पखवाजाच्या
मंगल निनाद, तालसुरात इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन मध्ये हरिनाम सप्ताह व माऊली गाथा पारायण सोहळा संपन्न झाला. श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड पंढरपूर आळंदी २२५ वर्ष फड स्थापनापूर्ती, श्रीगुरु नामदेव आण्णा माळी वसेकर यांची ११४ वी पुण्यतिथी, माऊली ज्ञानोबाराय जन्मोत्सव वर्ष ७५०, नामदेवराव समाधी संजीवन वर्ष ६७५, आजरेकर फडाचे विणेकरी वै. ह. भ. प जगदेव राऊ जाधव यांच्या पाचव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी भेट देऊन भारतीय संस्कृती ही संत महंत यांची असून त्यांनी जगाला समतेचा व ममतेचा संदेश दिल्याचे स्पष्ट केले. श्रीगुरु नामदेव आण्णा माळी वसेकर पुण्यतिथी उत्सव समितीचे अध्यक्ष भरतशेठ शहा यांनी उपरोक्त मान्यवरांचे स्वागत केले तर श्रीगुरु आजरेकर फडाचे प्रमुख हरिदास रामभाऊ बोराटे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी आजरेकर फडाचे प्रमुख, श्रीगुरु हरिदास बोराटे महाराज म्हणाले, वारकरी संप्रदायातील आजरेकर फड हा महत्त्वाचा घटक असून या फडाचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम माझी जन्मभूमी व कर्मभूमीत झाला याचा मला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमात वारकरी सांप्रदायिक श्री. शहा परिवाराचे अनमोल योगदान आहे. हरिनाम सप्ताहानंतर शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत व हरिनामाच्या गजरात सवाद्य नगरप्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. मुख्य बाजारपेठेत इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त श्रीमती मालती शहा, मुकुंदशेठ शहा, अंगद शहा, सौ. रुचिरा अंगद शहा, सौ. वैशाली भरत शहा यांनी या सोहळ्याचे स्वागत केले. कर्मयोगी कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष ह. भ. प गोकुळदास शहा यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. हरिनाम सप्ताहात ह. भ. प सागर बोराटे महाराज नातेपुते, देवेंद्र निढाळकर महाराज गाथामूर्ती, श्रीगुरु जयवंत बोधले महाराज पंढरपूर, श्रीगुरु चिन्मय महाराज सातारकर मुंबई, श्रीगुरु अमृत जोशी महाराज बीड, श्रीगुरु हरिदास बोराटे महाराज विठ्ठलवाडी यांनी किर्तन सेवा दिली तर आजरेकर फडाचे प्रमुख श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. या कार्यक्रमास महाराष्ट्र व कर्नाटक मधून वारकरी भक्त संप्रदाय उपस्थित होता. मुंबई, कोल्हापूर, सांगली, मिरज, सौंदत्ती, धारवाड, लातूर, नंदगड, अहिल्यानगर, वेंगुर्ला येथील हजारो भक्तांची उपस्थिती हा कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंदशेठ शहा, संतोष जाधव, ॲड. रामकृष्ण मोरे, शिवाजी शिंदे, बबन गाडे, गणेश महाजन, केशव बोराटे, पांडुरंग व्यवहारे, अभिजीत सूळ, रामभाऊ ढोकरे, वामन सूळ, सुहास दिवसे, तुकाराम बानकर, रामभाऊ शिवरकर, उदयशेठ शहा आदींनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा