Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

द्राक्ष बागायतदारांनी अद्यावत पद्धतीने शेती करून निर्यात क्षम द्राक्ष उत्पादन करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे-- डॉ. उपाध्याय


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

द्राक्ष हे नगदी, औषधी फळ पीक असून द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष शेतीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान वापरून फायद्याची शेती करणे ही काळाची गरज आहे. द्राक्ष बागायतदारांनी स्मार्ट होत अद्ययावत पद्धतीने शेती करून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. अजय उपाध्याय यांनी केले. शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी इंदापूर येथील आयएमएच्या डॉ. नि. तू. मांडके सभागृहात आयोजित द्राक्ष फळ छाटणी चर्चासत्रात ते बोलत होते.

डॉ. उपाध्याय पुढे म्हणाले, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या संसाधनांचा काटेकोर वापर द्राक्ष शेतीमध्ये करण्याची आवश्यकता आहे. एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर करून बोद वापसा अवस्थेमध्ये ठेवल्यास जागतिक दर्जाचे द्राक्ष उत्पादन द्राक्ष बागायतदार करतील असे त्यांनी सांगितले.

द्राक्ष संशोधन केंद्राचे फळ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत निकुंभे म्हणाले, द्राक्ष वेल व्यवस्थापनावर बागायतदार शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. द्राक्ष वेलींची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त जीवाणूंचा वापर करण्याचे तसेच बदलत्या वातावरणाला सामोरे जाण्यासाठी बागायतदारांनी प्लास्टिक आच्छादनांचा वापर करावे असे आवाहन त्यांनी केले. 

महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे म्हणाले, इंदापूर, बारामती, माढा, माळशिरस तालुक्या तील द्राक्ष बागायतदार मेहनत करत द्राक्ष उत्पादन घेत असून त्यांचे कौतुक आहे. भविष्यामध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या मदतीने या भागातील शेतकरी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पाया रचत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

 सदर कार्यक्रमास बारामती, इंदापूर, माढा, माळशिरस भागातील प्रयोगशील, प्रगतीशील बागायतदार शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक सुधीर वाघमोडे यांनी तर आभार प्रदर्शन मनोज मोरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा