कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
-----भाद्रपद मासातील अमावास्येच्या दिवशी जिल्ह्यात शेतकरी राजा सर्जा राजाचा बैलपोळा सण साजरा करतात. त्यानिमित्त परिसरातील बाजार पेठेत बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. परंतु यात्रिकीकरणाच्या जमान्यात बैलांची संख्या कमी झाल्याने पूजेसाठी मातीचे बैल घेण्याकडेही कल वाढला आहे. तर दुधाचे दर जेमतेम वाढल्याने गाय घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी राजा वाफश्याच्या प्रतिक्षेत असून सर्वच मालाचे दर स्थिर व माफक ठेवल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचे काम केले असल्याचे व्यापारी नीलेश चिखले यांनी सांगितले.
बैलपोळ्यासाठी सुताचे तयार माल वेसण, म्होरकी, पितळी साखळ्या, बेगड, पायांतील तोडे, पट्ट्या याप्रकारचा तयार माल सध्याला सहजरीत्या उपलब्ध होत आहे. पूर्वी मात्र अशा प्रकारचा माल मजुरांकडून हजेरीत तयार करून घ्यावा लागत होता. परिसरातील अकलूज, नीरा नरसिंहपूर, टेंभुर्णी, पिंपरी बुद्रुक, बावडा, रेडणी, इंदापूर आठवडे बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत बैल पोळ्याच्या खरेदीसाठी समाधानकारक पावसाच्या हजेरीने गर्दी वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.
बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे दर मागील वर्षी पेक्षा प्लास्टिकचे दर उतरल्याने कमी झाल्याचे व्यापारी निलेश चिखले यांनी सांगितले. त्यामध्ये बैलाच्या अंगावरील झूल १४०० ते ३२०० रुपये, बाशिंगे १८० ते २९०, घुंगरमाळ २०० ते २५०, पायांतील चाळ १०० ते २००, दृष्टीच्या माळा ७० ते १००, शिंवा १६० ते ५५०, कवड्यांच्या माळा ७० ते १८० रुपये, सुताची दोरी १५० ते ३०० काळा व रंगीत गोप २०० ते २५०, गळ्यातील बेल्ट १०० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. सुताचे प्रमाण वाढून तयार मालाला बाजारपेठेत मागणी वाढल्याने तयार माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे.
सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या जमान्यात प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात बैलजोड्या जाऊन त्याची जागा ट्रॅक्टरने घेतल्याची दिसत आहे. त्यामुळे बैलपोळा साजरा करणे नुसती औपचारिकता राहिल्याचे राहुल बागल यांनी सांगितले. तर जुन्या रूढी परंपरा ग्रामीण भागात अद्यापही जिवंत असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात बैलजोड्या व गावरान गाई दिसत असल्याचे रणधीर व विक्रम मोहिते यांनी सांगितले.
फोटो - बावडा येथे बैलपोळा सणाच्या साहित्याची दुकानात खरेदी करताना शेतकरी दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा