*सहसंपादक -डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी*
*इंदापूर,मो. 9922419159*
पुणे येथील खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ( स्वायत्त ), पुणे पुस्तक महोत्सव अंतर्गत वाचन संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर नेणारा अभूतपूर्व आणि विश्वविक्रमी उपक्रम कोहिनुर ग्रुपतर्फे साकारण्यात आला. “शांतता पुणेकर वाचत आहेत” या संकल्पनेवर आधारित, वाचन चळवळीत सहभागी वाचकांचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र वापरून मराठी देवनागरी लिपीत ‘पुस्तक’ या शब्दाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली.
या अभिनव उपक्रमा साठी तब्बल १७००१ वाचकांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला असून या उपक्रमाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवा अंतर्गत कोहिनुर ग्रुप, खडकी शिक्षण संस्था आणि टी. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात ऐतिहासिक कोहिनूर विक्रम नोंदवला आहे. या विश्वविक्रमी उपक्रमा मागील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, पुणे पुस्तक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश पांडे तसेच कोहिनुर ग्रुपचे सर्वेसर्वा कृष्णकुमार गोयल यांची आहे.
याप्रसंगी एनपीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सव आणि कोहिनुर ग्रुप व खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभा राहिलेला हा उपक्रम म्हणजे वाचन संस्कृतीचे वैचारिक आंदोलन आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमुळे केवळ विक्रम नोंदला गेला नाही तर वाचनाचे सामाजिक मूल्य अधिक दृढ झाले असून संस्थेच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर पडली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, वाचन ही केवळ अभ्यासाची प्रक्रिया नसून समाजमन घडवणारी शक्ती आहे. ‘पुस्तक’ या शब्दाची प्रतिकृती ही केवळ कलाकृती नसून ज्ञान, शांतता आणि विवेक यांची सामूहिक अभिव्यक्ती आहे. विद्यार्थ्यांना व समाजाला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी असे उपक्रम दिशादर्शक ठरतात.
पुणे पुस्तक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश पांडे म्हणाले, पुण्याची समृद्ध वाचन परंपरा जागतिक स्तरावर नेण्याचे कार्य या उपक्रमातून झाले आहे. १७००१ वाचकांच्या सहभागातून उभा राहिलेला हा विक्रम म्हणजे वाचन चळवळीचा उत्सव असून कोहिनुर ग्रुप व टी. जे. महाविद्यालयाने पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्दिष्टांना बळ दिले आहे.
खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कोहिनुर ग्रुपचे सर्वेसर्वा कृष्णकुमार गोयल अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, वाचन ही केवळ शैक्षणिक गरज नसून समाजात शांतता, संस्कार आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण करणारी चळवळ आहे. आज कोहिनुर ग्रुपने खडकी शिक्षण संस्था व टी. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात पुणे पुस्तक महोत्सवात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे ही चळवळ जागतिक पातळीवर नेली, याचा कोहिनुर ग्रुपला सार्थ अभिमान आहे.
यावेळी प्रसेनजित फडणवीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रासेयो संचालक गणेश भामे, संस्था पदाधिकारी काशिनाथ देवधर, रमेश अवस्थे, ॲड. अजय सूर्यवंशी हे मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवृंद, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागेश्री मंठाळकर यांनी तर आभार संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. स्वामीराज भिसे यांनी केले. या विश्वविक्रमी उपक्रमाने वाचन संस्कृतीचा जागर करत विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरेला जागतिक ओळख मिळवून दिली असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा