सहसंपादक--- डॉ, संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नोकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर युवापिढी केंद्रबिंदू मानून
रोजगार क्षमतेत वाढ करण्यासाठी ज्ञान, कौशल्य व उद्योग यामध्ये योग्य संतुलन असणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यश इन सभागृहात शिक्षण व उद्योग क्षेत्र समन्वय उपक्रम अंतर्गत निमा ( नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर असोसिएशन) व लघु उद्योग भारती यांच्या सोबत मुक्त विद्यापीठाची संयुक्त बैठक संपन्न झाली. रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी ज्ञान आणि उद्योग यांना एकत्र जोडणे हा या उपक्रमाचा व बैठकीचा उद्देश होता. यावेळी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, विद्यापीठ प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डॉ. डी. एम. गुजराथी, विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक प्रा. सुरेंद्र पाटोळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे पुढे म्हणाले, शिक्षण क्षेत्रातून उद्योग क्षेत्रात मनुष्यबळ जात असते. मात्र ते काहीसे कच्च्या स्वरूपातील असते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी, सन २०४७ पर्यंत शिक्षण व उद्योग क्षेत्राने एकमेकांची शक्तिस्थाने व गरजा ओळखून काम करणे महत्वाचे आहे. विद्यापीठाचे पाठयक्रम आधारित शिक्षणक्रम व उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज आधारित प्रात्यक्षिक यांची सांगड घालण्यासाठी, त्यांच्या तील कमतरता भरून काढण्यासाठी छोटे छोटे कॅप्सुल शिक्षणक्रम
,हस्तपुस्तिका, लिंकसह प्रत्यक्ष कामकाजाचे व शैक्षणिक माहितीचे छोटे छोटे व्हिडीओज तयार करणे गरजेचे आहे. उद्योग व्यवसायातील अद्ययावतीकरण व विकासासाठी विद्यापीठ या क्षेत्रात संशोधन व विकास करण्यासाठी एक दोन वर्षे अल्पमुदतीचे प्रकल्प सुरु करण्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे. विद्यापीठा तर्फे सुरु विविध रोजगाराभिमुख शिक्षणक्रम, उपक्रम यांची माहिती देत त्यांनी नाशिकसह देशाच्या विकासासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रासह आपण सर्वांनी एकत्र काम करुया असे आवाहन कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी शेवटी केले.
निमाचे संचालक आशिष नहार म्हणाले, नकारात्मकता झटकून सकारात्मकतेने आता काम सुरु असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. नाशिकचा कुंभमेळा हा विकासाचा देखील मेळा असल्याने त्यासाठी सर्वांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एकत्रित काम करण्याची गरज आहे. उद्योग क्षेत्राला अनेक शिक्षणक्रमांची व त्यातील प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजा आहे. त्यासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित येवून एक समिती बनवून त्या समितीने शिक्षण, प्रशिक्षणातून विकासाचा एक रोडमॅप बनवावा अशी महत्त्वपूर्ण सुचना त्यांनी मांडली.
लघुउद्योग भारती, नाशिकचे संचालक निखील तापडिया यांनी मुक्त विद्यापीठ व निमा च्या उपक्रमात आपण सर्वांनी संपूर्णपणे सक्रिय सहभागी होण्याचे आश्वासन दिले. सिन्नर सहकारी ओद्योगिक वसाहतीचे नामकरण आवारे यांनी उपलब्ध असलेला रोजगार व त्यासाठी आवश्यक असलेला कामगार यातील दरी – विसंगती दूर करण्यासाठी आजची बैठक उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी निमाचे संचालक संजय राठी, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, मिलिंद राजपूत, प्रकाश गुंजाळ, लघुउद्योग भारतीचे संचालक योगेश जोशी, स्टार्टअप इंडियाचे नाशिक येथील मार्गदर्शक श्रीकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना उपयुक्त सूचना मांडल्या.
बैठकीत 'संयुक्त चर्चा - सहकार्याच्या संधी' या विषयांतर्गत उद्योगाच्या गरजेनुसार शिक्षणक्रम विकास, ऑन-जॉब ट्रेनिंग, आवश्यक ते सामंजस्य करार, कंपन्यांसाठी तत्काळ मनुष्यबळाची उपलब्धता, त्यासाठी सल्लागार समिती व संयुक्त प्रकल्प यांसारख्या विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी निमा, लघुउद्योग भारतीचे विविध संचालक, पदाधिकारी, विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक, आभार प्रदर्शन प्रा. सुरेंद्र पाटोळे यांनी तर स्नेहल म्हापणकर यांनी सूत्रसंचलन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा