सहसंपादक--- डॉ, संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या तसेच अत्यंत चुरशीच्या झालेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये ७९.८९ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. यामध्ये महिलांनी लक्षवेधी सहभाग नोंदविला. शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्रांगणात आकर्षक रांगोळीने सजविलेल्या सखी मतदान केंद्राने सर्व युवती व महिलांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे हा सेल्फी पॉईंट ठरला. मतदानानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाकेबाजी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा म्हणाले, सब्र का फल हमेशा मीठा होता है. मतदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा यांच्या विकासकामावर विश्वास ठेवून मला व पॅनेलला मतदान केले आहे. आमच्याकडे शहराच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन असल्याने आमचा विजय निश्चित आहे.
यावेळी कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मान उंचावण्यासाठी तसेच इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवली असून आमच्या पॅनेलचे सर्व उमेदवार निश्चित विजयी झाल्यात जमा आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम समिती सभापती प्रवीण माने तसेच निष्ठावंत व स्वाभिमानी कार्यकर्ते यांचा मी अत्यंत आभारी आहे.
या निवडणुकीत एकूण २४८२९ मतदारांपैकी १९८३७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून १२१८८ पुरुष, १२६३४ महिला व इतर ७ असे एकूण २४८२९ मतदान होते. पैकी ९७५० पुरुष, १००८४ महिला तर इतर ३ असे एकूण १९८३७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर मागाडे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषद
मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली. निवडणुकीत किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रकिया शांततेत पार पडल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक एक मध्ये
७६ टक्के, दोन मध्ये ८३ टक्के, तीन मध्ये ८४ टक्के, चार मध्ये ७५ टक्के, पाच मध्ये ७८ टक्के, सहा मध्ये ८१ टक्के, सात मध्ये ८३ टक्के, आठ मध्ये ७९ टक्के, नऊ मध्ये ८० टक्के, दहा मध्ये ८१ टक्के मतदान झाले.
इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला.
कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी पहिल्या तासात मतदानाचा अधिकार बजावला. नगरपरिषदेची निवडणूक जवळपास तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लांबल्याने मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत ९.७५ टक्के मतदान झाले. साडेनऊ नंतर मतदान केंद्रावर मतदारांचा वेग वाढला. साडेअकरा पर्यंत २४.९५ टक्के मतदान झाले. मतदानाचा वेग वाढत दुपारी दीड वाजे पर्यंत ४३.१८ टक्के पर्यंत पोहचला. साडे तीन वाजता ही टक्केवारी ६०.४१ पर्यंत गेली. इंदापूर शहरातील परगावी नोकरीसाठी असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी कृष्णा भीमा विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. त्यामुळे सकाळी सात ते दहा या दरम्यान चा मतदारांचा आकडा वाढला. मतदानाचा हक्क बजावून ही मंडळी पुन्हा आपल्या कामावर किंवा घरी परतली. मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्र खोलीपर्यंत जाईपर्यंत उमेदवार मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काही मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये किरकोळ वादावाद झाली. काही मतदान केंद्रावर मशीन मध्ये चिन्ह दिसत नसल्याची तक्रार देखील करण्यात आली. इंदापूर शहरातील २७ मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७३०८ पुरुष तर ७६८८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. २४ हजार ८२९ मतदारांपैकी १५ हजार मतदारांनी मतदान केले होते. दुपारच्या सत्रात पुन्हा मतदानाच्या रांगा लागल्या. मतदान संपल्यानंतर रात्री उशिरा मतदानाची आकडेवारी घोषित करण्यात आली. खरे मागील निवडणुकी पेक्षा वाढलेली मतदानाची संख्या यामुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ही नेते, कार्यकर्ते व मतदारांमध्ये होती मात्र न्यायालयीन निकाला मुळे निकाल दिनांक २१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलला गेल्यामुळे सर्वांच्या अपेक्षे वर विरजण पडले असून राजकीय हवा शांत झाली आहे. मात्र आता इंदापूर मध्ये निश्चित विजय कोणाचा होणार, इंदापूरचा कारभारी कोण होणार यासंदर्भात पैजा लागल्या असून राजकीय धुरिणांचे मत आजमावले जात आहे. दरम्यान एका व्यक्तीचा मतदान करून घरी गेल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा