Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

*तुळजापूर खुर्द येथील हिंदू समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचे नगरपरिषदेला निवेदन*

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:--9730867448*




तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर खुर्द येथे हिंदू समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, हा प्रश्न गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मुख्य अधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना निवेदन देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

तुळजापूर खुर्द येथे मुस्लिम, लिंगायत आदी समाजांच्या स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध असताना हिंदू समाजासाठी मात्र अद्याप कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी अंत्यविधीच्या वेळी नातेवाईकांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा अंत्यसंस्कारासाठी स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतजमिनीचा आधार घ्यावा लागत असून, पावसाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर बनते. चिखल, खराब रस्ते आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे अंत्यविधी करणे अत्यंत कठीण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.



या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. वारंवार निवेदने देऊनही केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदू समाजात प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मुख्य अधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना “अंतिम स्मरणपत्र” स्वरूपात निवेदन दिले आहे. या निवेदनात तुळजापूर खुर्द येथे तातडीने हिंदू समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पंधरा दिवसांच्या आत योग्य निर्णय न झाल्यास संघटनेच्या वतीने आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

सदर निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी असून, या विषयाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथेही सादर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या निवेदनाची अधिकृत नोंद घेण्यात आली असून, त्याची शिक्कामोर्तब प्रत उपलब्ध आहे.

दरम्यान, तुळजापूर खुर्द येथील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील व मूलभूत विषयाकडे होणारे दुर्लक्ष दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त होत असून, सर्व समाजांना समान सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या गंभीर प्रश्नावर नगर परिषद व प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. वेळेत निर्णय न झाल्यास तुळजापूर खुर्द येथे तीव्र आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा