*सलीमखान पठाण*
*श्रीरामपूर*
*मो:-9226408082*
पवित्र रमजान महिन्याला कालपासून प्रारंभ झाला आहे.परवा सायंकाळी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे चंद्रदर्शन झाले नाही.
पवित्र रमजान महिना सायंकाळी मगरीब नंतर जो तो चंद्रदर्शन कुठे झाले का याची आतुरतेने विचार न करीत होते.चंद्रदर्शनाबाबत धार्मिक दृष्ट्या काही संकेत आहेत साधारण दोनशे किलोमीटरच्या आत जर चंद्र दर्शन झाले तर त्या ठिकाणी मास आरंभ होतो.इतर ठिकाणी मात्र त्याची साक्ष पटल्यानंतरच ग्राह्य धरला जातो.देशाच्या अनेक भागांमध्ये याबाबत भिन्नता दिसते.मात्र परवा सायंकाळी संपूर्ण देशभरात एकाच वेळी चंद्र दर्शन झाल्याच्या वार्ता आल्याने एकाच वेळी रमजान महिना सुरू झाला.
जुन्या काळात चंद्रदर्शनाबाबत काही संभ्रम होते.त्यामुळे प्रेषित हजरत पैगंबर आणि चंद्र पाहून रोजी सुरू करा आणि चंद्र पाहून ईद साजरी करा असे संकेत दिले.ती परंपरा आजही सुरू आहे.ज्या ठिकाणी चंद्र दर्शन होणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी तो पहावा आणि मग रोजे सुरू करावे. याबाबत उलेमांची समिती जिल्हा सिरत कमिटी म्हणतात ती निर्णय घेत असते.
रमजान हा प्रत्येक सत्कार्याची प्रेरणा देणारा महिना आहे .चांगल्याचे संवर्धन आणि वाईटाचे क्षालन हा या महिन्याचा स्थायीभाव आहे.मोठ्या पासून छोट्या पर्यंत सर्व प्रकारच्या वाईट कृत्यापासून अलिप्त राहून,करता येईल तेवढे चांगले आणि सत्कार्य करण्याची प्रेरणा रमजान महिन्यात मिळते.अल्लाहची प्रार्थना (इबादत) ही फक्त नमाज,रोजा आणि कुरआन पठण केल्याने होत नाही तर आपण जे कर्म करतो,जे कार्य करतो ती सुद्धा इबादत आहे.भुकेल्यांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी देणे, आजारी रुग्णांची सेवा करणे, गरजवंताला मदत करणे ही सुद्धा एक प्रकारची प्रार्थना आहे.
हजरत पैगंबरांनी सांगितले आहे कि तुम्ही घरामध्ये चांगले,गोड-धोड खाण्याआधी आपल्या शेजार्याची पण काळजी घ्या.भलेही तो कोणत्याही धर्माचा असो.सर्व मानव समान ही इस्लामची शिकवण आहे.पैगंबरांनी कुणाचाही कधी तिरस्कार केला नाही. एखादी व्यक्ती,ज्याला ते नापसंत करीत होते,परंतु ती समोर आल्यानंतर उदार मनाने त्या व्यक्तीशी संवाद साधत होते.तिरस्कार म्हणजे नफरत हा प्रकार त्यांच्याजवळ नव्हता .
रमजान महिन्यांमध्ये सर्व सद्गुणांची जोपासना करण्याचे कार्य केले जाते . आणि हे कार्य पुढे कायमस्वरूपी टिकावे अशी अपेक्षा सुद्धा केली जाते. (क्रमशः)
*सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*९२२६४०८०८२*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा