*उपसंपादक --नुरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
रोटरी क्लब अकलूज यांच्या वतीने माळीनगर (ता.माळशिरस) येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या ४ शाळांसाठी ई-लर्निंग स्मार्ट टीव्ही प्रणाली प्रदान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत संस्थेच्या ४ शाळांना देणगी स्वरूपात ४ स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आले. हा सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि सासवड माळी शुगर फॅक्टरी व एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे होते. तसेच यावेळी सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमास रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रो. केतन बोरावके, सचिव रो. अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख रो. कल्पेश पांढरे, रो. नवनाथ नागणे, रो. सीए नितीन कुदळे, रो. गोमटेश दोशी, रो. दिपक फडे, रो. ओजस दोभाडा, रो. अभिषेक टेके व रो. अजित वीर, गुलमोहर इंग्लिश मीडियमचे प्राचार्य वसंत आंबोडकर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:
या डिजिटल ई-लर्निंग स्मार्ट टीव्ही प्रणालीचा लाभ संस्थेतील ३५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. दृकश्राव्य माध्यमामुळे शिक्षण अधिक सोपे, समजण्यास सुलभ आणि प्रभावी होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाल्याने स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे.
- रो.सुधीर लातूरे,रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा