Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

*रमजानुल मुबारक - ११* *सब्र अर्थात संयम - रोजाचा स्थायीभाव*

 सलीम खान पठाण -श्रीरामपूर*

*९२२६४०८०८२*


रमजान महिन्याचा दुसरा अशरा आता सुरु झाला आहे.दैनंदिन दिनक्रम आता स्थिर झाला आहे. उन्हाळयाची चाहूल लागल्याने त्याचा त्रास ही काही अंशी अंगवळणी पडला आहे. पूर्वी मंदिर, मशिदी या कच्च्या होत्या मात्र भक्ति करणारे भक्त पक्के होते.आता खूप बदल झालाय रात्रीच्या नमाज मध्ये प्रार्थना करतांनाही आरामात विना त्रास करण्याची प्रवृती वाढत आहे.आपण उन्हाळ्याची थोडीशी तीव्रता सहन करु शकत नाही,मग जे रात्रंदिवस भट्टी समोर उभे राहून कार्य करतात ते कसे सहन करीत असतील त्यांची जाणिव यानिमित्ताने सर्वांना होत असेल.               रमजान महिन्यातील रोजे म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे.संयम (सब्र) निर्मिती हा देखील रोजाचा स्थायीभाव आहे.म्हणूनच रमजान ला सब्र का महिना असे ही म्हटले जाते.रमजान मध्ये उपवास सुरू केल्यानंतर आपण स्वतःच काही बंधने लादून घेत असतो.एकदा पहाटे सहेरी खाण्याची वेळ संपल्यानंतर सूर्यास्ता पर्यंत काही ही न खाण्याचा निश्चय स्वतःच करीत असतो.हीच स्वयंशिस्त आपल्यामध्ये संयम निर्माण करते.उपवास केल्याने भुकेल्याची अवस्था, तहानलेल्यांची व्याकुळता याची जाण आपल्यात निर्माण होते.ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही त्यांची काय अवस्था होत असेल याची जाणिव निर्माण होते.जे तहानलेले असतात त्यांच्या प्रती सहानुभूतीची भावना निर्माण होते. आपल्याला सर्व सुखे प्राप्त आहेत.परंतु या जगात जे दीन आहेत,गरीब,अनाथ आहेत ते आपले जीवन कसे जगत असतील याची जाणिव रोजा मुळे निर्माण होते.एकदा रोजा धरल्यानंतर सायंकाळपर्यंत आता काहीही सेवन करायचे नाही अन्यथा ईश्वर नाराज होईल ही भिती मनात बाळगून आपण मगरीब ची वेळ होण्याची आतुरतेने वाट पाहत असतो.अकरा महिने मगरीब आपली वाट पाहते पण या महिनाभर आपण मगरीबची प्रतिक्षा करीत असतो.एक मिनीट जरी इफ्तारला वेळ असेल व आपल्याला कितीही तहान लागलेली असली तरी आपण समोरच्या पाण्याच्या ग्लासला हात लावीत नाही, स्वयंशिस्तीचे यापेक्षा दुसरे मोठे किंवा उत्तम उदाहरण शोधूनही सापडणार नाही.



समाजातील जे गरजू घटक आहेत त्यांच्या गरजांची जाणिव व्हावी व या गरजा पूर्ण करण्याची भावना आपल्यात निर्माण व्हावी हा रोजाचा मूळ उद्देश आहे. रोजाच्या माध्यमातून ईश्वरी आदेशांचे पालन करुन आपले वर्तन सदाचारी करण्याबरोबरच आपल्या स्वच्छंदी आचरणाला लगाम घालून स्वतःच स्वतःवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न रोजेदार हा करीत असतो. खाणं पिणं सोडून इतरही अनेक बंधने रोजदारावर असतात.त्या सर्व बंधनांचे काटेकोर पालन करून रोजा पूर्ण केला जातो.या कठीण प्रसंगी जो संयम धरला जातो त्याला सब्र म्हणतात आणि सब्रचा मोबदला जन्नत आहे. (क्रमशः) 

*सलीमखान पठाण* 

  *श्रीरामपूर*

*९२२६४०८०८२*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा