*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
विद्या प्रतिष्ठान संचलित इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये महाविद्यालयाच्या
ॲम्फीथिएटर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे, सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात अभिवादन करण्यात आले. उद्घाटनानंतर श्रद्धा गलांडे हिने जोशपूर्ण ‘शिवगर्जना’ देत कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. त्यानंतर श्रावणी दिवसे, शिवांजली पाटील आणि गौरी जामदार यांनी प्रभावी चित्तथरारक लाठी काठीचे सादरीकरण केले. तद्नंतर समीक्षा कुलाळ हिने शिवचरित्रावर आधारित स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर गोपाळ गवळी आणि सुजल पोपळे यांनी अँडव्हान्स लाठीकाठीचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात ओम फाळके आणि अश्विनी बनसोडे यांनी आपल्या सुरेल आवाजात पोवाडा गायन सादर करून वातावरण शिवमय भारावून टाकले.
यानिमित्त प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, शिवरायांचे जीवन हे केवळ इतिहास नसून ते नेतृत्व, शिस्त, दूरदृष्टी, स्त्री सन्मान, गनिमी कावा, धर्मनिरपेक्षता आणि सुशासन यांचे जिवंत उदाहरण आहे. आजच्या तंत्रज्ञान युगात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शिवरायांकडून संघटनकौशल्य, धैर्य, निर्णयक्षमता आणि स्वराज्याची प्रेरणा घ्यावी. कोणतेही कार्य करताना त्याचे प्रयोजन, नियोजन आणि आयोजन कसे करावे हे शिवरायांकडून शिकावे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लाठीकाठी, कविता आणि पोवाडा या कलाप्रकारांचे विशेष कौतुक करत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कला, शौर्य आणि संस्कार यांचा सुंदर संगम आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाची सांगता प्रसंगी गोपाळ गवळी व विवेक घाडगे यांनी जोशपूर्ण शिवगर्जना करत महाराजांना वंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका सूर्यवंशी यांनी प्रभावीपणे केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. संतोष देवकाते आणि सहाय्य प्रा. सचिन पवार यांनी केले. या उत्साहपूर्ण आणि संस्कारमय कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून, शिवजयंतीचा सोहळा अविस्मरणीय ठरला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा