Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

*बारामती-कुरकुंभ-दौंड परिसर हादरवणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश* _कोयत्याच्या धाकाने करत होते लूटमार; बारामती तालुका पोलिसांची थरारक कामगिरी_

 कार्यकारी संपादक 

एस.बी.तांबोळी

टाइम्स 45 न्यूज मराठी 

 मो:-8378081147


-भिगवण-बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा (ता.बारामती) येथे रात्रीच्या वेळी कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत कार अडवून प्रवाशांवर प्राणघातक हल्ला करून जबरदस्तीने चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात ६ ते ७ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबत विश्वराजे उर्फ विश्वा चंद्रशेखर पाटील (वय १८) यांनी फिर्याद दिली आहे. ते सध्या शिक्षणासाठी शारदानगर (ता. बारामती) येथील कॉमन होस्टेलमध्ये वास्तव्यास असून मूळ रहिवासी उमरड (ता.करमाळा, जि.सोलापूर) आहेत. फिर्यादी व त्यांचे सहकारी मारुती सुझुकी कंपनीच्या कॅरी गाडीतून प्रवास करत असताना दि.७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जैनकवाडी फाट्याजवळ ६ ते ७ अनोळखी इसमांनी अचानक रस्त्यात आडवे जात गाडी अडवली. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. यावेळी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी करण्यात आले व जबरदस्तीने चोरी करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादीची स्कायबॅग कंपनीची जांभळ्या रंगाची बॅग, सोबतच्या मुलाची काळ्या रंगाची बॅग, गाडीच्या चालकाचा मोटोरोला कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन, रेडमी कंपनीची चार्जिंग पॉवर बँक, एटीएम कार्ड, विविध कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण १२ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हल्लेखोरांनी लुटून नेला.

      टोळी धुडगूस घालत असल्याची माहिती होमगार्ड जवान सूर्यवंशी यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिल्यानंतर, यादव यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली असता एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून टोळीतील आरोपींनी मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य लुटून नेल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक यादव यांनी आरोपींचे वर्णन, वापरलेली वाहने याच्या आधारे तातडीने शोधमोहीम सुरू केली. याबाबत भिगवण, दौंड व यवत पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले.

मोटारसायकल व रिक्षाच्या मदतीने पळणाऱ्या आरोपींचा केडगाव चौफुला-सुपा रोडवर थरारक पाठलाग करण्यात आला. या दरम्यान दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तर उर्वरित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांनी हार न मानता पुन्हा सखोल शोधमोहीम राबवत पळालेल्या तिघांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळवले. एक आरोपी मात्र फरार असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

या आरोपींनी कुरकुंभ येथील इंडियन ऑईल चे पेट्रोल पंपावरील सेल्समन म्हणून काम करणारे रवींद्र महेश खडके वय वर्ष 26 धंदा मूळ रा . बार्शी ता . बार्शी जिल्हा सोलापूर हल्ली रा . गोपाळवाडी ता . दौंड जि. पुणे यांच्यावर सुद्धा कोयत्याने गंभीरवार केला.

अटकेतील आरोपींकडून तीन धारदार कोयते, एक मोठा बेसबॉल रॉड तसेच चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईत कृष्णा राजू मोरे रा. मार्केट यार्ड, पुणे, रुपेश सुरेश आडवाल रा. रासकर पार्क, कात्रज,

संकेत अनंत शिलते रा.पर्वती दर्शन, पुणे, ईश्वर महादेव मिसाळ रा.खोपडे नगर, कात्रज या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईदरम्यान निरगुडे (ता. इंदापूर), भिगवण आणि कुरकुंभ परिसरातील स्थानिक नागरिकांनी आरोपी शोधण्यात मोलाचे सहकार्य केले, यामुळे पोलिसांच्या कामाला अधिक बळ मिळाले. कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर वेळेत घाव घालून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या बारामती तालुका पोलिसांचे धाडस, मेहनत आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक  संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार अमोल कदम बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार मनोज पवार दादा दराडे सुरेंद्र वाघ भारत खारतोडे राहुल लांडगे भिगवन पोलीस स्टेशनचे महेश उगले होमगार्ड जवान सुमित सूर्यवंशी अजिंक्य नाळे यांनी केली.

या कामी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे कुरकुंभ चौकीचे श्रीरंग शिंदे शंकर वाघमारे यवतचे पोलिस अंमलदार गुरु गायकवाड यांची चांगली मदत झाली.

तसेच बारामती येथील नागरिक ऋषिकेश पतंगे निरगुडे येथील पोलिस पाटील अशोक राजे भोसले अमर राजे भोसले कुरकुंभ चे पोलीस पाटील विनोद शितोळे गोरख अडसुळ सूरज साळुंखे अभि दहाळे सुनील पवार उमेश सोनवणे अमोल झगडे मयूर पवार स्वप्निल शितोळे किशोर गिरामे यांची आरोपी शोधकामी चांगली मदत झाली.

     कोयत्याचा धाक दाखवून मारहाण व लूटमार करणाऱ्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी अत्यंत धाडसी, नियोजनबद्ध आणि मेहनतीची कारवाई करत मोठा घाव घातला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता ३१०, ३११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        - सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती

 रस्त्यावरून प्रवास करत असताना जर अशा हालचाली लक्षात आल्या तर तात्काळ पोलिसांना संपर्क साधा अथवा ११२ वर कॉल करा. पोलीस लवकर आपल्या मदतीला पोहोचतील.

        ~गणेश बिरादार, अपर पोलिस अधीक्षक बारामती विभाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा