इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. 9922419159
इंदापूर पतंजली योग समितीच्या वतीने समितीचे
प्रमुख योग रत्न दत्तात्रय अनपट, अंकुश पाडुळे, श्री नायर अण्णा यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून इंदापूर तालुक्याचा नावलौकिक देश विदेशात उंचावणाऱ्या गुणवंतांचा विशेष गौरव करण्यात आला. पतंजली योग समितीच्या प्रमुख योग साधकांच्या उपस्थितीत हा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी योग रत्न दत्तात्रय अनपट म्हणाले, गुणवंत खेळाडू, नागरिक हे आपले इंदापूर भूषण आहेत. त्यांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
याप्रसंगी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, योग प्राणायाम तसेच पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक काकासाहेब मांढरे यांना ' महाराष्ट्र गौरव सन्मान ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकार श्री मांढरे यांच्या कार्याचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला
इंदापूरच्या मॅरेथॉन वीरांनी देशाच्या सीमा ओलांडून दक्षिण आफ्रिकेतील कठीण समजली जाणारी ९० किलोमीटर ची मॅरेथॉन स्पर्धा अवघ्या १० तासांत यशस्वीपणे पूर्ण केली. मॅरेथॉन वीर संतोष वाघचौरे, संदीप जाधव आणि गोपीनाथ मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. इंदापूर मध्ये मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी 'इंद्रेश्वर मॅरेथॉन'चे यशस्वी आयोजन करून इंदापूरकरांना आरोग्याचा नवा छंद लावल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
इस्रो आणि शिक्षणात देखील इंदापूरची कन्या कु. तनिष्का आत्माराम फलफले हिने सुवर्ण गरुड भरारी घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ( इस्रो ) प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्याबद्दल कु. तनिष्का आत्माराम फलफले हिचा देखील विशेष गौरव करण्यात आला. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल राज घाडगे, श्रेयस बोंगाणे आणि अभिनव गटकुळ या विद्यार्थ्यांचे देखील विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. इंदापूर तालुक्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा नैपुण्य संपादन केले आहे.
आंतरराष्ट्रीय बेसबॉल संघात निवड झाल्याबद्दल अक्षय बाळासाहेब मोरे आणि आंतरराष्ट्रीय कुराश शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अथर्व सचिन मोरे यांचा सन्मान करण्यात आला. या खेळाडूंनी इंदापूरचे नाव जागतिक नकाशावर कोरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी पतंजली योग समितीचे विविध पदाधिकारी, योग शिक्षक, योग शिक्षिका तसेच योग साधक आणि साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले आणि "अशा कर्तृत्ववान व्यक्तींमुळेच समाजाला नवी प्रेरणा मिळते," असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाची सांगता उत्साही वातावरणात करण्यात आली.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा