Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

*करमाळ्याच्या. ट्रॅफिक मुळे चालत्या बोलत्या जीवाचा बळी ---संताप जनक?......भीष्मा चांदणे*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*




दिनांक 17 डिसेंबर 2025 चा एक वर्दळीचा दिवस.. एक अस्वस्थ बाप नेटके हॉस्पिटल मधून मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून डॉक्टर रोहन यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या 23 वर्षीय चालत्या बोलत्या मुलीला रिक्षात घेऊन चाललाय... फुल सौंदर चौकात त्यांची रिक्षा येते तर तिथे वर्धमान मेडिकल शेजारी, दुकानापुढे एक चार चाकी गाडी चार्जिंगला लावलेली..... त्याच्या शेजारी कुरुमकर ट्रान्सपोर्ट वाल्याची एक गाडी माल खाली करतेय....त्याचा ड्रायव्हर 501 वाल्याकडे बिल आणायला गेलेला... 

रिक्षातील बाप पूर्ण गोंधळलेला आहे... हाताश आहे... त्याच्या काळजामध्ये भीतीचे  दडपण आहे. कारण त्या दोन गाड्यांमधून हार्डली दुचाकी जाण्याइतपत रस्ता उरलाय.. 

बाप त्यांना रस्ता द्या म्हणून गयावया करतोय.. मेडिकल इमर्जन्सी आहे राव... रिक्षाला वाट द्या... त्याचं मन आक्रंदतय.... रिक्षात मुलीच्या नजरेत जीवन मृत्यूचे द्वंद्व सुरू आहे.. या साऱ्या गोंधळात 15 ते 20 मिनिटे वाया गेले... थोडा रस्ता मोकळा झाला तेव्हा तो बाप रिक्षात बसला, तोच त्या मुलीला अटॅक आला आणि तिथेच ती निष्प्राण झाली......

 बापाने तिला दवाखान्यात नेले पण डॉक्टर म्हणाले की उशीर झाला.. दहा मिनिटे अगोदर तुम्ही आला असता तर आम्ही काहीतरी करू शकलो असतो.. बापाच्या नजरेसमोर एका चालत्या बोलत्या जीवाचा अंत झाला.....

 मुळात जीवन मृत्यू कोणाच्याही हातात नाही. मरण येणारच असेल तर ते कुठेही कोणत्याही प्रसंगात येईल हे जरी मान्य केले तरी मी तिला वेळेवर दवाखान्यात पोहोचवू शकलो नाही हे शल्य, ही जीवघेणी वेदना तो बाप आयुष्यभर आपल्या काळजात वागवूनच जगणार.....यासारखं मोठं दुःख नाही..

ही आपल्या करमाळ्याची शोकांतिका आहे.. "आपल्या करमाळ्यात ना लोकांना कसलीच शिस्त नाही," असे प्रत्येक जण बोलतो. पण हे बेशिस्तीच गाव ट्रॅफिकच्या बाबतीत थोडं फार का होईना शिस्तीत येईल याचा प्रयत्न कोणीही करताना दिसणार नाही ही आपली मानसिकता आहे......

 भर दुपारी, भर दिवसा मालाने भरलेली चार चाकी वाहने शहरात घुसतात...प्रवासी मोटारी,रिक्षा, मोटार सायकल वाले मेन रोड, राशिन पेठ व इतर पेठातून कसेही चालतात.. त्यांच्यामुळे त्यांच्या मागचे सारे ट्रॅफिक जाम होते.. 15 ते 20 मिनिटे ट्रॅफिक नुसते अजगरासारखे सुस्तावते.... तरीही त्या गर्दीतील माणसे बिनलाज्या प्रमाणे त्या चार चाकी वाहना मागून हळूहळू सरकत राहतात... ही आपली शोकांतिका... कोणी मरो जगो मला त्याचे काय घेणे देणे... *माझ्या दुकानात माल कमी पडता कामा नये माझा धंदा माल नाही म्हणून बंद पडता कामा नये... ही दुकानदारांची मानसिकता...त्यामुळेच अशा मेडिकल इमर्जन्सीत या ट्रॅफिक मुळे कोणी मेले तरी यांना त्याचे सोयरे सुतक नसते....*  म्हणूनच खिन्नपणे म्हणावेसे वाटते की इथली माणसे भावना शून्य आहेत. त्यांना दुसऱ्याच्या भावनेची कदर नाही. त्यामुळे या गावातील वाहतूक व्यवस्था ही अशी रगेल आणि अडेल तट्टू बनली आहे..

आणि तुम्हाला सांगतो.... या गावात सारे महत्त्वाचे दवाखाने मेन रोड, राशिन पेठ, दत्त पेठ अशाच ठिकाणी आहेत.. *पण हे गाव टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर वाल्यांच्या बापाची मिराशी आहे... हे सारे या गावातील संस्थानिक आहेत. त्यांना कोणी काय म्हणायचे???? म्हणूनच कोणी एखादी मुलगी अशी दुर्दैवीपणे मृत्युमुखी पडते..*

गावातील स्वयंघोषित नेते, पुढारी काय करतात कोणास ठाऊक?? *नगरपालिका प्रशासन कासेत हात घातल्याशिवाय उठत नाही..*  कधी कोणत्या काळी वन वे चा ठराव झालाय म्हणे... *सम विषम पार्किंगचे बोर्ड गावात फक्त कुत्र्यांना मुतण्यासाठी उभे आहेत...* त्यांचीही आता नसबंदी चालू आहे मग एवढं असूनही या ट्रॅफिकला थोडीफार शिस्त लावण्याचा प्रकार येथे का होत नाही हा आभाळाएवढा मोठा प्रश्न आहे..

व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन संध्याकाळी पाच नंतर मालाची वाहने या महत्त्वाच्या रस्त्यावर यावीत.. रस्त्यावर विनापरवाने खड्डे घेणारे, बांधकाम साहित्य टाकणारे यांना दंड बसवण्यात यावा.... मुळातच इथले  रस्ते अरुंद आहेत. म्हणून पोलिसांनी अभियान राबवून गर्दीच्या वेळेस काही ठराविक वाहने वगळता बाकीच्या चार चाकी वाहनांना ठराविक कालावधीत या पेठा मध्ये प्रवेश बंद करावा.. ट्रॅफिकची ऐशी तैशी करणाऱ्या टू व्हीलर वर कारवाई करावी.. नाहीतर आणखी कोणाचा तरी बळी नक्की जाणार हे सांगायला कोणत्या भविष्यवेत्त्याची गरज नाही... आणि हो.... या साऱ्या गोष्टी प्रभावाने राबवण्यासाठी ज्या राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे ना, ती इच्छाशक्ती नगरपालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांकडे नक्की आहे.  ?...

 म्हणूनच आशा करूयात की लवकरच हे सारे चित्र बदलेल.. आणि पुन्हा दुर्दैवी बापाच्या खांद्यावर त्याच्या लाडक्या लेकरांचे प्रेत जाणार नाही एवढेच....


 *भीष्मा चांदणे ©*

 *करमाळा*

*9881174988*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा