*मुख्यसंपादक*
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो;-9730867448
काटी (ता. तुळजापूर) येथील गावठाण हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दि. 12 जानेवारी रोजी पंचायत समिती तुळजापूर कार्यालय परिसरात अमर उपोषणास सुरुवात करण्यात आली. उपोषणाचा आज पहिला दिवस असून, प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही अतिक्रमणावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
काटी येथील नागरिक श्रीकांत सौदागर गोटे यांनी यापूर्वी पंचायत समिती व ग्रामपंचायत काटी येथे दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावातील सार्वजनिक वापराचा मुख्य रस्ता काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमित केला आहे. संबंधितांनी थेट रस्त्यावर कॉलम उभारून बांधकाम सुरू केल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन ये-जा अडथळाग्रस्त झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, वृद्ध नागरिक, महिला व रुग्णांना बसत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
या अतिक्रमणप्रकरणी ग्रामपंचायत काटी, पंचायत समिती तुळजापूर तसेच संबंधित विभागांकडे वेळोवेळी लेखी तक्रारी व अर्ज सादर करण्यात आले होते. ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवण्याबाबत आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट अतिक्रमणधारकांकडून बांधकाम सुरूच असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे संबंधित तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या अमर उपोषणात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, दत्तात्रय सोनवणे, श्रीकांत घाटे, भागवत बरंगडे, सारिका चुंगे, सुषमा शिंदे, शोभा घाटे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांनी एकमताने अतिक्रमण हटवण्याची मागणी लावून धरली.
अतिक्रमण तात्काळ हटवून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. अमर उपोषण सुरू झाल्याने पंचायत समिती परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा