*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे धरणग्रस्त शेतक-यांनी आणि मच्छीमार यांनी जलसंपदा विभागाने दिलेल्या अतिक्रमण हटाव नोटीसांची होळी करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गुढीपाडव्याचा सण आणि मराठी नववर्ष प्रारंभ असताना करण्यात आले.
निलेश देवकर यासंदर्भात म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दिनांक १७ जून २०१९ व ८ ऑक्टोबर २०२५ रोजी उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना अतिक्रमण नोटीसा देऊन या जमिनी ४९ वर्षाच्या कराराने खाजगी उद्योजक यांच्या घश्यात घालण्याचा जुलमी निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध आंदोलन सुरू केल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयास तात्काळ स्थगिती देण्याचा तसेच या गाळपेर जमिनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना कराराने भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी हा निर्णय अद्याप रद्द झाला नाही. त्यामुळे या निर्णयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुढी पाडव्याचा सण असताना देखील अन्यायकारक शासन निर्णयाची होळी करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले
रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर पुढे म्हणाले, उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर, दौंड, कर्जत, करमाळा माढा या तालुक्यातील सुमारे १३ हजार हेक्टर संपादित वहिवाट असलेली गाळपेर जमीन ही जाहीर प्रकटन करून धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अकरा महिने कराराने, १२ वर्षाच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. उजनी धरणाला लागून मोठी भिंत आहे, तिथे फ्लोटिंग ( तरंगता ) सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प नियोजित आहे. मात्र या प्रकल्पाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात येऊन तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या प्रकल्पा बाबत पुढील निर्णय घेण्याचे देखील मुंबईतील बैठकीत ठरले होते. उजनी धरणा लगत ३५० हेक्टर जमीन आहे, याठिकाणी पर्यटन केंद्र प्रस्तावित आहे, मात्र सध्या तेथे ६० ते ७० हेक्टर जमीन शेतकरी वहिवाटत आहेत तसेच उजनी गावठाण येथेही २५०- ३०० हेक्टर जमीन असून तेथेही पर्यटन केंद्र प्रस्तावित आहे. अधिवेशन संपले तरी मुंबईत झालेल्या बैठकीतील शासन निर्णयाची अद्याप अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे निलेश देवकर यांनी सांगितले. उजनी पाणलोट क्षेत्रात अनेक गावात हे आंदोलन करण्यात आले असून माढा तालुक्यातील शेतकरी व मच्छीमार यांनी देखील एल्गार पुकारला असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा