*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
मराठी नववर्षाच्या स्वागतार्थ शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावर्षी देखील ' सद्गुणांचा गुढीपाडवा ' हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर आणि विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालय प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. गुढी पाडवा म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने मागील वर्षापासून हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'सद्गुणांची माला' ही संकल्पना होती. गुढी उभारताना त्यावर प्रामाणिकपणा,धैर्य, करुणा, सहकार्य, सत्य, अहिंसा आणि प्रेम यांसारख्या मानवी मूल्यांचे प्रतीक असलेली माळ अर्पण करण्यात आली. परंपरेला आधुनिक विचारांची जोड देत, जीवनात सद्गुणांचा स्वीकार करून एक आदर्श आणि सुसंस्कृत समाज घडवणे हेच आपल्या सणांचे खरे सार आहे, असा प्रेरणादायी संदेश या माध्यमातून देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान संस्थेने समाजातील प्रत्येक घटकाला आपले जीवन अधिक मूल्यवान आणि गुणकारी बनवण्याचे आवाहन केले. मराठी नववर्षाचा हा प्रारंभ केवळ आनंद साजरा करण्यासाठी नसून, तो आत्मचिंतन आणि सकारात्मक बदलाचा संकल्प करणारा ठरला. या उपक्रमामुळे उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात उच्च मूल्यांचा समावेश करण्याची नवी ऊर्जा मिळाली.
या सोहळ्यासाठी संस्थेचे विश्वस्त अरविंद गारटकर, आरोग्य केंद्र प्रमुख महादेव चव्हाण, कोपीवरची शाळा प्रमुख भारत बोराटे, हमीदभाई अत्तार, प्रकल्प अधिकारी सागर कांबळे, अमोल राऊत, कुमार गवळी आणि संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा