Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ मार्च, २०२६

*संगम गावातील सुपुत्राची उल्लेखनीय कामगिरी; डॉ. आबासाहेब पराडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान*

 *मुख्य संपादक* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

      *मो:-9730867448*




राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे दिनांक १५ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या ३९व्या दीक्षांत समारंभात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील संगम येथील डॉ. आबासाहेब सुलोचना कल्याण पराडे यांना पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातून  डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली.



महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दिनांक १५ मार्च २०२६ रोजी ३९ वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. या भव्य दीक्षांत समारंभास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, आमदार मोनिका राजळे तसेच राज्यातील विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (D.Sc.) या मानद पदवीने गौरविण्यात आले.डॉ. पराडे यांना आचार्य पदवी राज्याचे नवनियुक्त राज्यपाल मा. जिष्णूदेव वर्मा यांच्या हस्ते बहाल करण्यात आली.

डॉ. पराडे यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे संगम गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.

डॉ. पराडे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे वडील कल्याण नाना पराडे व आई सुलोचना कल्याण पराडे हे शेती व्यवसाय करतात. आपल्या मुलाने डॉक्टरेट पदवी प्राप्त करावी, असे स्वप्न त्यांच्या आई-वडिलांनी पाहिले होते आणि ते स्वप्न डॉ. पराडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संगम येथे झाले. पुढे त्यांनी सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर *रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज* येथून बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. पुढे शासकीय कृषी महाविद्यालय, लातूर येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली.

*संशोधन कार्य विशेष ठरले*

डॉ. पराडे यांनी कुक्कुटपालन क्षेत्रात केलेले संशोधन अत्यंत उपयुक्त व शेतकरी-केंद्रित आहे. त्यांच्या संशोधनामध्ये कुक्कुट व्यवस्थापन, अंडी व मांस उत्पादन वाढ, पक्ष्यांचे आरोग्य सुधारणा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळू शकते, यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.

त्यांच्या अभ्यासामुळे कुक्कुटपालनातील उत्पादकता वाढविणे, पक्ष्यांची कार्यक्षमता सुधारणा आणि शाश्वत शेतीस पूरक उपाय सुचविणे याबाबत महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. त्यांच्या संशोधनाचा प्रत्यक्ष फायदा शेतकरी वर्गाला होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या संशोधनासाठी त्यांना डॉ. शैलेश कांबळे (प्रमुख, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग) व डॉ. दिलीप देवकर (सहयोगी प्राध्यापक) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. लावार, डॉ. मंडकमाले, डॉ. नरवाडे, डॉ. ढगे, डॉ. गायकवाड, डॉ. अडांगळे व डॉ. लोखंडे यांनीही मोलाचे सहकार्य केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे हे यश प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा