*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी झालेली शिवजयंती यंदा एका वेगळ्या 'वैचारिक क्रांती'साठी ओळखली गेली. महाराष्ट्रातील अनेक गावांत डीजे आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत, लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांची शेकडो स्मारके उभारण्यात आली. मात्र, या स्मारकांच्या नियमितीकरणाचा आणि शिवप्रेमींवर होणाऱ्या कारवाईचा प्रश्न गंभीर होता. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्री. महेश डोंगरे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि शिवप्रेमींच्या भावनांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पाऊल उचलले.
महेश डोंगरे पाटील हे केवळ समन्वयक नसून समाजाच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व आहे. बुलढाणा येथे शिवस्मारकाच्या संरक्षणासाठी मराठा भगिनींवर झालेला अन्याय असो वा सोलापूरसह इतर जिल्ह्यांतील अशा संवेदनशील घटना, महेश डोंगरे पाटील यांनी नेहमीच घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाला जाब विचारला आहे. "ही स्मारके केवळ दगड-मातीची नसून येणाऱ्या पिढीला संस्कार देणारी केंद्रे आहेत," ही त्यांची भूमिका समाजात महत्त्वाची ठरली आहे. याच संवेदनशीलतेतून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की, लोकसहभागातून उभारलेल्या या स्मारकांना अधिकृत मान्यता मिळावी आणि कोणत्याही शिवप्रेमीवर प्रशासकीय गुन्हे दाखल होऊ नयेत.
या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींच्या बाजूने सकारात्मक कौल दिला आहे. त्यांनी तातडीने महसूल सचिव आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या स्मारकांच्या नियमितीकरणासाठी सुवर्णमध्य काढण्याचे आश्वासन देतानाच, प्रशासनाने कोणत्याही शिवप्रेमीला नाहक त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचनाही शिंदे साहेबांनी दिल्या आहेत.
स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे शिवरायांच्या विचारांचे पाईक असल्याने, या स्मारकांना लवकरच सरकारी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. महेश डोंगरे पाटील यांच्या या यशस्वी शिष्टाईमुळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता महाराजांची स्मारके डौलाने उभी राहतील. या माध्यमातून शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि वैचारिक वारसा पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा