Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ मार्च, २०२६

इंदापूर महाविद्यालयात जागतिक मातृभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा, मराठी भाषा कदाचित संस्कृतपूर्व भाषा असू शकते : डॉ. संपत गायकवाड.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथील मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक मातृ भाषा दिन व मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.


या निमित्त तीनही विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या विषयांवर आधारित विविध आशयघन पोस्टरचे प्रदर्शन भरविले. विद्यार्थ्यांनी भाषेचे महत्त्व, मातृ भाषेचे संवर्धन, मराठी भाषेचा इतिहास तसेच विविध भारतीय भाषांची वैशिष्ट्ये यावर प्रभावी सादरीकरण केले.

प्रमुख पाहुणे म्हणून सांगली येथील कवी व मराठी भाषा अभ्यासक डॉ. संपत गायकवाड उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब शामराव सावंत सर होते.

यावेळी डॉ. संपत गायकवाड म्हणाले, "जोपर्यंत कोणतीही भाषा समाजजीवनात वापरली जाते, बोलली जाते, तोपर्यंत त्या भाषेला मरण नसते. मराठी भाषा कदाचित संस्कृतपूर्व भाषा असू शकते. अनेक परकीय आक्रमणांनंतरही मराठी भाषेने आपले स्वत्व जपले आहे. इतर भाषांतील शब्दांचा स्वीकार करूनही तिने आपली ओळख टिकवून ठेवली आहे. मराठी या आपल्या मातृभाषेचा गौरव उंचावण्यासाठी युवा पिढीने मराठीदूत म्हणून योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. बाळासाहेब सावंत म्हणाले, "भाषा म्हणजे  समाजाची संस्कृती असते. भाषा जिवंत राहिली तर तो समाज आणि त्याची संस्कृती टिकून राहते."

या प्रसंगी हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शितल पवार व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. रोहन व्यवहारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कला शाखाप्रमुख डॉ. भरत भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. शिवाजी वीर, प्रा. चांगदेव जाधव, प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. मृदुल गायकवाड व इतर प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. फिरोज शेख यांनी केले. आभार प्रा. मुक्ता पिसे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा