*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘परिणामाधिष्ठित व्यवस्थापन दृष्टिकोन वापरून पदवीधर रोजगार क्षमता रचनेची अंमलबजावणी’ या विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. कॅनडा येथे आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या कोल सेमका ( कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग – कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया ) चे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ‘नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य’ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १२ मार्च २०२६ दरम्यान ही कार्यशाळा संपन्न झाली.
उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, कोल सेमकाच्या सल्लागार व कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. माधुरी दुबे, विद्यापीठाच्या ‘नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य’ विभागाचे प्रमुख डॉ. अमोल शिरफुले हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात बोलतांना कुलगुरू प्रा. सोनवणे म्हणाले, जागतिक पातळीवरील अद्ययावत ज्ञान व तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर कसे पोहोचवता येईल व त्यातून रोजगारक्षम पदवीधर कसे तयार करता येईल हे आजच्या शिक्षण व्यवस्थेपुढील प्रमुख आव्हान आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० या दृष्टीने मार्गदर्शक आहे. मुक्त विद्यापीठाने देखील त्या धोरणानुसार पुढाकार घेत आपल्या विविध विद्याशाखांच्या सर्व शिक्षणक्रमांचे नवीनीकरण सुरु केले आहे. विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला कौशल्याधारित व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे, त्याच्या पदवीनुसार त्यास योग्य रोजगार मिळावा यादृष्टीने त्याला सक्षम बनवणे यासाठी विद्यापीठ सदैव प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ सातत्याने अशा प्रकारच्या कार्यशाळा, रोजगार मेळावे व नवोपक्रम आयोजित करत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी केले. यावेळी कोल सेमकाच्या सल्लागार व कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. माधुरी दुबे म्हणाल्या, पारंपारिक सिद्धांतावर आधारित व वाचन लिखाण पुरती मर्यादित शिक्षण पद्धती आता मागे पडली आहे. आता कौशल्याधारित व बाजारपेठेच्या गरजेनुसार आवश्यक शिक्षणपद्धतीस महत्व प्राप्त झाले आहे. समस्येचे विवेचन करण्यापेक्षा समस्येची सोडवणूक, समाधान यास अधिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जगभरातील नोकरी - व्यवसायाच्या संरचनेत देखील बदल होत आहेत. विविध विद्यापीठे यांनी हे समजून घेवून आपल्या शिक्षणक्रमात बदल अथवा सुधारणा करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी देखील या बदलासाठी स्वत:ला तयार करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करायला हवी. त्यासाठी नवीन संकल्पना, पद्धती, तंत्रज्ञान याचा अंगीकार करायला हवा असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक डॉ. अमोल शिरफुले यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. माधुरी खर्जुल यांनी तर आभार प्रदर्शन मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे संचालक नागार्जुन वाडेकर यांनी केले. यावेळी विविध विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, शैक्षणिक संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा