*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
नवी दिल्ली (संसद भवन) : दिनांक १० मार्च २०२६
आज नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे युद्धाचे परिणाम भारतातही दिसू लागले असून व्यापार करारामुळे भाजीपाला व शेतीमाल अमेरिकेकडून आयात करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
इतक्या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारकडून केवळ निवेदन देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद हे देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असताना विरोधकांना बोलू दिले जात नाही, संसदेत सखोल चर्चा होऊ दिली जात नाही आणि अनेक मुद्दे संसदेच्या अधिकृत नोंदीतही येऊ दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत संसद चालवण्याचा अर्थ काय, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, अमेरिका–इस्त्राईल–इराण या युद्धपरिस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही. या संघर्षाचे परिणाम भारतावर होत असतानाही सरकारकडून याबाबत ठोस भूमिका मांडली जात नाही. भारतात युद्ध अभ्यासासाठी आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून कारवाई झाल्याबाबतही केंद्र सरकारकडून एक शब्दही उच्चारला जात नाही, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
देशासमोर उभ्या राहिलेल्या गॅस तुटवडा, इंधन टंचाई आणि युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांवर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही आणि चर्चा टाळली जात आहे. अशा परिस्थितीत संसद अधिवेशन घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याची प्रतिमा निर्माण होत असून त्यामुळे देशाची भूमिका कमजोर होत आहे. देशाला कमजोर करण्याचे श्रेय पंतप्रधानांकडेच जाते, असेही त्यांनी सांगितले.
देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा