*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
तुळजापूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध आयात व विक्री सुरू असून यावर संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने येत्या ३० मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धाराशिव येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तुळजापूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यातून गुटख्याची आयात केली जात असून ग्रामीण व शहरी भागात मोठमोठी गोदामे उभारून त्याठिकाणाहून होलसेल पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही केवळ कागदोपत्रीच ही बंदी असल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
तसेच तुळजापूर शहरासह ग्रामीण भागात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असून त्यावर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई होत नसल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गुटखा सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असूनही प्रशासनाकडून प्रभावी पावले उचलली जात नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
यापूर्वीही याच मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर व गुटखा माफियांवर आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
तुळजापूर तालुक्यात संपूर्णपणे गुटखा विक्री बंद करण्यासाठी आणि गुटखा माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने ३० मार्च २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धाराशिव येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर समितीचे पदाधिकारी श्री. गणेश प्रभाकरराव पाटील यांच्या स्वाक्षरी असून आंदोलनाबाबतची माहिती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व तुळजापूर पोलिस स्टेशनलाही देण्यात आली आहे.
प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन गुटखा माफियांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा