*सलीमखान पठाण*
*श्रीरामपूर*
*९२२६४०८०८२*
पवित्र रमजान महिन्याची उदया किंवा परवा सांगता होण्याची दाट शक्यता आहे. महिना कसा गेला ते क्षण क्षण समजले देखील नाही.महिनाभर रोजे, पाचवेळची नमाज, तरावीहची नमाज,सहेरी, इफ्तार या दिनक्रमामुळे दररोजच्या जीवनाला एक दिशा प्राप्त झाली.वेळेची शिस्त निर्माण झाली.सर्व कामे वेळेवर करण्याची स्वयंशिस्त निर्माण झाली. उन्हाळ्याची तीव्रता असतांना देखील अल्लाहच्या भक्तांनी रोजे धरले,प्रार्थना केली.सर्व धार्मिक विधी पार पाडले. विशेष म्हणजे रमजान महिन्यात काय केले पाहिजे हे अल्लाहने नमूद केले,भक्तांनी स्वतः त्याप्रमाणे आचरण करण्याचा निर्णय घेतला व त्यावर अंमल केला.तहान लागलेली असतांना व समोर पाणी उपलब्ध असतांना त्याला हात ही लावला नाही हे नियंत्रण स्वतः निर्माण केले यासाठी कोणताही कायदा करावा लागला नाही.हीच स्वयंशिस्त मानवाला अध्यात्माकडे प्रोत्साहीत करते.
ईश्वराने मानवाच्या भल्यासाठी सर्व प्रकारच्या साधनांची निर्मिती केली. अन्नसेवन करतांना किंवा केल्यानंतर त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, फळे,कंद आदि उगवले.मानवी शरीराला अपाय होऊ नये यासाठी अनेक प्रकारच्या जडीबुटी निर्माण केल्या.निरर्थक अशी एकही गोष्ट या सृष्टीत निर्माण केलेली नाही.मात्र मानवाला त्यांचा योग्य प्रकारे उपभोग घेता आलेला नाही.सृष्टीच्या निर्माण कर्त्या परमेश्वराने सर्व सोयी सुविधा निर्माण केल्या मात्र आपण त्याचा योग्य विनियोग न करता गैरवापर केल्याने मानव आज अडचणीत सापडला आहे.
अल्लाहने कुरआन शरीफच्या माध्यमातून मानवासाठी आचारसंहिता निर्माण करून दिली आहे.प्रत्येकाने त्याप्रमाणे वर्तन करायचे, वागायचे आहे.आपल्या सर्व कर्माचे आडिट कयामतच्या दिवशी होणार आहे.या जगात जीवन जगतांना केलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट कार्याचा खाते उतारा (नाम ए आमाल किंवा आमालनामा) आपल्याला त्या दिवशी मिळेल आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वर्ग कि नरक याचा फैसला झालेला असेल.जे जे चुकीचे केले असेल त्याची परतफेड करावी लागेल.सर्व हिशोब काटेकोर असेल तेथे समायोजन नाही.कारण आपल्या सर्व कार्याचा आडिटर अल्लाह आहे. दुनियेतला आडिटर लाच घेऊन तुमच्या बाजूने सकारात्मक अहवाल देईल मात्र तो जगाचा आडिटर कोणतीही लाच घेत नसल्याने तो अहवाल जसा येईल तसा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल.म्हणून प्रत्येकाने सचोटीचा स्विकार करावा व त्याप्रमाणे जीवनक्रमण करावे हाच एकमेव पर्याय आहे.रमजानुल मुबारक या लेखमाले इस्लाम धर्मा बद्दलची माहिती इतर धर्मिय बंधू भगिनीपर्यंत पोहोचवून इस्लामचा खरा परिचय करून देण्याचा अल्पसा परिचय गेली २८ वर्ष मी करीत आहे.वाचकांचा या लेखमालेस मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा खऱ्या अर्थाने संस्मरणीय आहे.(क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*श्रीरामपूर*
*९२२६४०८०८२*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा