*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा थकीत वीज बिलामुळे महावितरणकडून खंडित करण्यात आला होता. त्यामुळे कार्यालयातील ऑनलाईन स्वरूपातील विविध शासकीय कामकाज दिवसभर ठप्प राहिले आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, उशिरा दिलेल्या धनादेशानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आला.
या संदर्भात उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी प्रिया पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयाचे सुमारे सहा महिन्यांचे वीज बिल थकीत होते. एकूण १६,५०० रुपयांच्या बिलापैकी ११ हजार रुपये भरण्यासाठी धनादेश देण्यात आला होता. सुरुवातीला महावितरणकडून संपूर्ण थकीत रक्कम भरण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, नंतर दिलेल्या धनादेशाच्या आधारे सायंकाळी वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील फेरफार, नोंदी व इतर ऑनलाईन सेवा दिवसभर पूर्णपणे बंद पडल्या. याचा थेट परिणाम नागरिकांवर झाला असून, कामासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. विशेषतः शेतकरी व जमीन व्यवहार करणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
दरम्यान, महावितरणकडून याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
महावितरणची प्रतिक्रिया :
“गेल्या एक वर्षांपासून भूमी अभिलेख कार्यालयाचे वीज बिल थकीत होते. बिल भरण्याबाबत एक महिन्यापूर्वी नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बिल भरले गेले नाही. त्यामुळे नियमांनुसार वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर संबंधितांकडून धनादेश प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आला.”
— रघुनाथ शिंदे, शाखा अभियंता, महावितरण, करमाळा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
या प्रकारामुळे शासकीय कार्यालयांच्या कामकाजातील आर्थिक नियोजन आणि जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी वेळेत बिल भरणे व नियोजनबद्ध कारभार करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा