*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या दिवशी तुळजापुरात घडलेली घटना राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या घटनेचा धाराशिव चे आमदार कैलास दादा पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे
डीवायएसपी निलेश देशमुख यांनी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना अमानुष मारहाण करत महिलांनाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार संतापजनक आणि अत्यंत निंदनीय आहे..
देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे संरक्षण करणे, त्यांना माहिती देणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असताना, त्यांच्यावरच दडपशाहीचा मार्ग अवलंबला जाणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. विशेषतः महिलांवर हात उचलण्याचा प्रकार हा केवळ निषेधार्ह नाही, तर समाजाच्या संस्कृती आणि मूल्यांना काळिमा फासणारा आहे..
एकीकडे सामान्य नागरिक आणि भाविकांवर खाकी वर्दीचा धाक दाखवून अत्याचार केला जातो, तर दुसरीकडे गुन्हेगारांसमोर पोलिस यंत्रणा गुडघे टेकताना दिसते हा नेमका कोणता न्याय?
दुसरीकडे, ड्रग तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तब्बल १३ महिन्यांपासून फरार असूनही पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नाही. इतकेच नव्हे, तर गुटखा तस्करीच्या प्रकरणात जप्त केलेला माल सोडवण्यासाठी हाच फरार आरोपी थेट पोलिस ठाण्यात येऊन दमदाटी करतो आणि पोलिस मात्र हातावर हात ठेवून बसतात, ही बाब अधिकच धक्कादायक आहे..
तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणारे लाखो भाविक हे श्रद्धेने नतमस्तक होणारे नागरिक आहेत, गुन्हेगार नाहीत. त्यांच्यावर होणारा अन्याय म्हणजे सर्व भाविकांचा अपमान आहे..
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित डीवायएसपी निलेश देशमुख यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी आमदार कैलास दादा पाटील यांनी केली आहे..





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा