*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रो. सुधीर लातूरे यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूरला औपचारिक भेट देऊन क्लबच्या कार्याचे कौतुक केले. ५ एप्रिल २०२६ रोजी रोजी हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्ह येथे हा सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या प्रसंगी फर्स्ट लेडी रो. संगीता लातुरे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. डॉ. राजगोपाल तापडिया तसेच सहाय्यक प्रांतपाल रो. जयश्री चव्हाण यांची उपस्थिती लाभली.
गव्हर्नर लातूरे यांनी क्लबच्या संचालक मंडळा सोबत बैठक घेऊन या वर्षात करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
उत्कृष्ट व्यावसायिक सेवा व सामाजिक कार्याबद्दल तीन व्यवसायिकांना "रोटरी आत्मनिर्भर" पुरस्कार देण्यात आला. यामध्ये श्री. रमेश डाकलिया - युनिफॉर्म क्षेत्रातील उत्कृष्ट गारमेंट व्यवसायासाठी, श्री. सुबोध भुतडा - सोलापुरातील सुप्रसिद्ध अटलांस मॉलचे संचालक आणि श्री. विश्वनाथ व सौ. सारिका गिडवीर यांना विश्व ट्रॉफी शोरूम मार्फत उत्कृष्ट ट्रॉफी व्यवसाय तसेच दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी विशेष कार्य करणारे श्री. श्रीराम मुरलीधर घाडगे यांना "रोटरी सक्षम पुरस्कार" देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्लबच्या अध्यक्षा रो. धनश्री केळकर यांनी सर्वांचे स्वागत करून अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी क्लब प्रशासन तसेच वर्षभरातील वैशिष्ट्यपूर्ण सेवा प्रकल्पांची माहिती दिली. सचिव निलेश फोफलिया यांनी सचिव अहवाल सादर करत विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. २०२५-२६ वर्षात रोटरी क्लब ऑफ सोलापूरने अनेक मोठे, महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवले आहेत. यामध्ये २५ मनपा शाळांमध्ये २५०० शब्दकोशांचे वितरण, श्री साईबाबा प्रशाला येथे विज्ञान प्रयोगशाळा, बाल शस्त्रक्रिया शिबिर, महिलांच्या आरोग्यासाठी रोटरी आदिशक्ती पिंक ओपीडी, रोटरी अन्नपूर्णा योजना, महाविद्यालयांमध्ये थॅलेसेमिया जनजागृती, महिला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग, ई वेस्ट संकलन, पाण्याच्या टाक्यांचे वितरण, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, अनेक व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम, शाळा महाविद्यालयांसाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतले आहेत. सहाय्यक प्रांतपाल रो. जयश्री चव्हाण यांनी क्लबच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे यांनी आपल्या मनोगतात क्लबच्या वर्षभरातील उल्लेखनीय व परिणामकारक कार्याचे मनापासून कौतुक केले. विविध सेवा प्रकल्पांमुळे समाजावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 'चांगल्या कार्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकाग्रतेने आणि उत्कटतेने काम करणे आवश्यक आहे' असा संदेश त्यांनी देऊन उपस्थित सदस्यांना अधिक जोमाने समाजसेवेसाठी प्रेरित केले. १०० हून अधिक सदस्य उपस्थित असलेला आणि सेवा गौरव आणि प्रेरणेचा सुरेख संगम असलेला हा कार्यक्रम आनंदाचा संस्मरणीय ठेवा ठरला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा