*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापतीपदी मावळ, वेल्हे, हवेली आणि इंदापूर या तालुक्यातील अनुक्रमे दीपाली हुलावळे, अमोल नलावडे, अंकिता पाटील आणि जितेंद्र बढेकर यांची निवड करण्यात आली. यानुसार दीपाली हुलावळे यांची बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी, अमोल नलावडे यांची कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील यांची तर, समाजकल्याण समिती सभापतीपदी हवेली तालुक्यातील जितेंद्र बढेकर यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे ऐनवेळी खेड, जुन्नर, शिरुर आणि बारामती या तालुक्यांचा पत्ता कट झाला आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांची बैठक गुरुवारी (दि.2 एप्रिल) सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांनी सभापती पदांच्या नावांबाबतचे पाठवलेले बंद पाकिट उघडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीमंत ढोले आणि सर्व सदस्य उपस्थित होते. सभापती पदासाठीची समितीनिहाय नावे जाहीर करण्यात आल्यानंतर या सर्व नावांवर पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, सभापती पदांसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या चारही उमेदवारांचे सभापती पदासाठीचे उमेदवारी अर्ज अध्यक्षांच्या बंगल्यावरच भरण्यात आले आणि तेथून जिल्हा परिषदेत येऊन पीठासन अधिकारी यशवंत माने यांच्याकडे दाखल करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे नवे सभापती अनुक्रमे अमोल नलावडे हे वेल्हे तालुक्यातील विंझर जिल्हा परिषद गटातून, दीपाली हुलावळे या मावळ तालुक्यातील खडकाळे, अंकिता पाटील या इंदापूर तालुक्यातील बावडा तर, जितेंद्र बढेकर हे हवेली तालुक्यातील ऊरळीकांचन जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत.
भोरचे विक्रम खुटवड यांनी सभापतीपद नाकारले
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांनी आधी भोर तालुक्यातील विक्रम खुटवड यांना सभापती पदाची संधी दिली होती. त्यांचे नावही अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते. परंतू, खुटवड यांनी मला सभापती पद नको म्हणत, ही संधी नाकारली. त्यानंतर ऐनवेळी खुटवड यांच्याऐवजी वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांना संधी देण्यात आली.
आमदारांची मागणी फेटाळली
दरम्यान, बुधवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत मंत्र्यांचे तालुके असलेल्या इंदापूर व बारामती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा तालुका असलेल्या पुरंदर या तीन तालुक्यांना जिल्हा परिषदेचे सभापतीपद देऊ नये, अशी मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली होती. मात्र कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या तालुक्यातील अंकिता पाटील यांना महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आजी-माजी आमदारांची मागणी नाकारली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सभापती निवडीचे अंतिम अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले होते.
ऐनवेळी बारामतीऐवजी इंदापूरने मारली बाजी
दरम्यान, जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीचे संभाव्य सूत्र हे निश्चित करण्यात आले होते. या संभाव्य सुत्रानूसार निश्चित करण्यात आलेल्या खेड व जुन्नर या दोन्ही तालुक्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मात्र निश्चित केलेल्या सुत्रांनुसार ऐनवेळी बारामती तालुक्याला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ही शक्यता फोल ठरली आहे. बारामतीच्या ऐवजी इंदापूरला संधी देण्यात आली आहे. यामुळे ऐनवेळी बारामतीच्या ऐवजी इंदापूरने बाजी मारली आहे.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा