*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे चालू असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनास आज तीन महिने पूर्ण झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून काही तांत्रिक कारणांमुळे आलेले अडथळे वगळता सलग तीन महिने आवर्तन चालू असल्याने करमाळा तालुक्यातील पुर्व भागात पिकांना वरदान मिळाले आहे. तसेच अनेक ठिकाणी जनावरांच्या पिण्याची व चाऱ्याची काही कालावधी साठी तरी सोय निर्माण झाली आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे चालू आवर्तन हे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले होते. यानंतर या आवर्तनात नेरले, वरकुटे, घोटी, मलवडी चारी, केम चारी, निंभोरे, कोंढेज, लव्हे, सौंदे, वरकटणे, सरफडोह, शेलगाव (क), अर्जूननगर शिवार, फिसरे शिवारातील काही ओढे व बंधारे, गुरसळी, देवळाली, खडकेवाडी, कुंभेज, जेऊर, हजारवाडी, जेऊरवाडी आदि ठिकाणच्या पाणी साठ्यात पाणी उपलब्ध करून देण्यात आले. अगदी जानेवारी महिन्यात हे आवर्तन सुरू केले असल्याने त्यावेळी काही ठिकाणी पिकांच्या अडचणी असल्याने शेतकऱ्यांनी स्वतः हुन पाणी उपलब्ध असताना घेतले नाही. पण जिथे कसलाही अडथळा नाही अशा सर्व भागात पाणी दिले गेले.नंतर ऊसा सारखी पिके काढली गेल्यामुळे परत या भागात पाणी दिले गेले आहे. तर काही ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन काम चालू असल्याने पाणी देण्यात तांत्रिक कारणांमुळे अडचणी आल्या आहेत. अन्यथा बहुतांश ठिकाणी या तीन महिन्यांत पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अजुनही मलवडी चारी, घोटी शिवारातील काही तलाव, शेलगाव परिसरातील काही बंधारे, पांडे ओढा, झरे व पोफळज तलाव आदि ठिकाणच्या पाणी साठ्यात पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडे आली असुन या ठिकाणी पाणी पोहोच करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.
तसेच अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की तीन महिने आवर्तन सुरू असल्याने उजनी जलपात्रातील शेवाळ हे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक पंप, बंदिस्त पाईप व डिसी चेंबर या मध्ये जमा होत आहे. तसेच कुंभेज येथील पंप हाऊस दोन समोरील पाणी साठवण भागात उजनीतील शेवाळ व प्लॅस्टिक व कचरा मोठ्या प्रमाणात जमा होऊन पंप हाऊस दोन मधील पंप चालवताना तांत्रिक खंड पडत आहे यावर पाटबंधारे विभाग युध्दपातळीवर नियोजन करुन अडथळा कमी प्रमाणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. तीन महिने अविरतपणे पंप चालू असल्याने उजनीतुन पाणी उपसण्याची क्षमता अर्थात पाणी डिस्चार्ज कमी झाल्याने पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. यामुळे मुख्य कॅनाल मधील पाणी प्रवाह मंदावल्याने नियोजित ठिकाणी पाणी पोहचण्यास वेळ लागत आहे तरी उर्वरित ठिकाणी पाणी पोहचण्यासाठी मुख्य कॅनाल वरील इलेक्ट्रिक मोटार व सायपन द्वारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांनी काही काळ पाणी न घेता प्रवाहास पुढे जाऊ दिले तर मलवडी व घोटी येथील ठिकाणी पाणी पोहोच होईल. आमदार नारायण आबा पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली व पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नियोजनातुन सलग तीन महिने हे आवर्तन चालू असुन सलग तीन महिने आवर्तन चालू ठेवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे तळेकर यांनी सांगितले. तसेच दहिगाव उपसा सिंचन योजना ही आमदार नारायण आबा पाटील यांच्या कालावधीत पुर्ण क्षमतेने चालू असुन उर्वरित ठिकाणी पाणी देण्यासाठी प्रयत्न राहतील असेही सांगण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा