इंदापूर, डॉ.संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159
विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. चाकण, पुणे येथील नामांकित बजाज ऑटो लिमिटेड, या कंपनीत तब्बल २९ विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस मुलाखतीव्दारे झाली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक दोन लाख चार हजार रुपये इतके आकर्षक वेतन पॅकेज देण्यात आले आहे. यामध्ये ऑटोमोबाईल विभागातील ६, ई अँड टीसी विभागातील १६ आणि मेकॅनिकल विभागातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची प्रभावी झलक दिसून आली आहे. या प्लेसमेंट प्रक्रियेसाठीची मुलाखत बजाज ऑटो लिमिटेड चे प्रशिक्षण व्यवस्थापक गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून कौशल्य, नवोपक्रमशीलता आणि उद्योगाशी सुसंगतता अत्यंत महत्त्वाची आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना लर्निग बाय डूईंग या तत्त्वावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. या यशातून विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे समर्पण आणि संस्थेची गुणवत्ता अधोरेखित होते. भविष्यातही विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर आपली छाप पाडावी, हीच एकमेव अपेक्षा आहे.”
महाविद्यालयाचे प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी प्रा. योगेश जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांना उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार तयार करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. त्यासाठी नियमित मॉक इंटरव्ह्यू, तांत्रिक व सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण, तसेच करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही संधी मिळवली आहे. हा यशाचा टप्पा त्यांच्या उज्ज्वल करिअरची सुरुवात आहे.”
बजाज ऑटो लिमिटेड चे प्रशिक्षण व्यवस्थापक गणेश जाधव म्हणाले, “प्लेसमेंट ही केवळ नोकरी मिळवण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया घालणारा महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांना उद्योगाच्या अपेक्षांनुसार तयार करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण, समस्या आधारित शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द आणि सातत्य हेच या यशाचे खरे गमक आहे.”
निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.
शुभम संतोष आसबे, वैभव रमेश काशीद, यश समाधान लोखंडे, अनिशा संतोष चंदनशिवे, वैश्नवी राजू भोसले, कुमार सतीश हरळे, मनीषा किसन ओव्हाळ, मेघना रेवणनाथ बदर, बुश्रा शकील सय्यद, साक्षी सिद्धेश्वर वागज, वैश्नवी देविदास यादव, श्रुती नितीन गावडे, सुयश हरिश्चंद्र हगारे, प्रणव प्रदीप जाधव, सृष्टी महारुद्र जगताप, सानिका संतोष कदम, सानिका विठ्ठल कानगुडे, प्रीती नाथा खरात, दीदी अनिल मार्कड, ओम संतोष पारवे, सुरज बापू नाळे, प्रशांत रविंद्र यादव, वैश्नवी बी. मुरूमकर, साक्षी सतीश सोनवणे, वृषाली दादासाहेब वाल्टे, राजवर्धन मारुती साळुंखे, ओम पोपट गोफणे, सैफली रफिक शेख, कार्तिक किसन पारलेकर.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची संपूर्ण टीम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त, प्राचार्य व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा