इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
आई नाशेरा मुलाणी हिचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फक्त दहावी पर्यंत झाले. एकीकडे घरची
हलाखीची परिस्थिती असताना देखील इंदापूर येथील सुश्रुत हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून काम करत तिने आपली मुलगी उजमा हिला पोलीस करण्याचे तिने स्वप्न पाहिले. हॉस्पिटलच्या कामातून जसा वेळ मिळेल तसे तिने होमगार्ड म्हणून देखील काम केले. आईने केलेला त्याग तसेच तिने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उजमा हिने देखील जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर पोलीस परीक्षा उत्तीर्ण होऊन आईचे स्वप्न पूर्ण केले. यश मिळविण्यासाठी कुठलाही शॉर्ट कट नसतो. मात्र यश संपादन करण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन, कठोर मेहनत आणि आत्मविश्वास याची गरज असते अशी यशाची गुरुकिल्ली असल्याचे उजमा मुलाणी यांनी सांगितले.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत स्वतःचे भविष्य घडवणाऱ्या उजमा आलम मुलाणी हिने पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामागे आई नाशेरा आलम मुलाणी यांचे गेल्या १५ ते २० वर्षांचे कष्ट, त्याग आणि जिद्द तिला प्रेरणादायी ठरली आहे.
इंदापूर शहरात व्यंकटेशनगर येथे राहणाऱ्या नाशेरा मुलाणी यांनी रुग्णालयात काम करत तसेच होमगार्ड म्हणून काम करत एकुलत्या एका मुलीचा सांभाळ केला. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही कमी पडू दिली नाही. “मुलीने शिकून मोठं व्हावं” या ध्यासाने त्यांनी प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात उजमाची शैक्षणिक कारकिर्द घडवली.
उजमाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण श्री नारायणदास रामदास विद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत तिने बारावीपर्यंतची वाटचाल पूर्ण केली. शिक्षणासोबतच तिने पोलीस भरतीसाठी निरंतरपणे मेहनत घेतली. तिला ईगल स्पोर्ट अकादमीचे प्रशिक्षक अभिजित गाढवे सर यांचे यथोचित मार्गदर्शन लाभून अखेर तिच्या जिद्दीला यश मिळाले. उजमा मुलाणीची पुणे ग्रामीण पोलीस दलात निवड झाली. तिचे हे यश केवळ वैयक्तिक नसून आईच्या अथक परिश्रमांचे फळ आहे.
उजमा आणि तिच्या आईच्या संघर्षमय यशोगाथा सर्वांना प्रेरणादायी ठरली आहे.
राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्ष भरत शहा, नगरसेविका दीप्ती राऊत, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, शकिलभाई सय्यद, प्रशांत उंबरे, उमेश मखरे, सुश्रुत हॉस्पिटल चे संचालक डॉ. श्रेणिक शहा, इंदापूर नगरपरिषदेचे माजी गट नेते कैलास कदम, सौ. मीना कदम, वसीम बागवान, इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल माने, महेश निंबाळकर, स्मिता नेवरेकर यांनी तिचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
*उजमा मुलाणी हिच्या यशा बाबत "टाइम्स 45 न्यूज मराठी"चे , संपादक - हुसेन मुलाणी आणि समुहाचे वतीने --हार्दिक हार्दिक शुभेच्छा*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा