इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवार दि. २४ एप्रिल पासून पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यासाठी सतत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी निरा भिमा कारखान्यावरती शनिवारी दि.२५ एप्रिल रोजी भेट घेऊन सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
सध्या उजनी धरणाच्या पावर हाऊस मधून १६०० क्युसेक्स व दरवाजामधून ४००० क्युसेक्स याप्रमाणे एकूण ६००० क्युसेक्स या क्षमतेने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. इंदापूर व माढा तालुक्यातील नदी काठच्या गावांमधील नागरिक, ग्रामपंचायतींचे सरपंच, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आदींनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत नदीत पाणी सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या बद्दल आभार व्यक्त केले.
भीमा नदीकाठच्या गावांमधील व नदी पात्रातील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी, त्याच बरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. प्रखर उन्हाळा असल्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
एप्रिल महिन्याच्या प्रारंभी इंदापूर तालुक्यातील तसेच माढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर येथे भेटून निवेदनाद्वारे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, अधिक्षक अभियंता उजनी धरण
सु. स. खांडेकर यांच्याशी भीमा नदीत पाणी सोडणे संदर्भात परिस्थितीची माहिती देऊन सविस्तर चर्चा केली होती. तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षते खाली गुरुवारी दि.१६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी नदीमध्ये पाणी सोडणे संदर्भात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची जाणीव करून देत आग्रही भूमिका घेतली होती. त्याचबरोबर उजनी पाणलोट क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पावसाळ्यापर्यंत पाणी पुरले पाहिजे व उजनी पाणलोट क्षेत्रातील गावांच्या पिण्याच्या पाणी योजनांना पाणी कमी पडू देऊ नये, अशी आग्रही भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी मांडली होती. सदर ऑनलाईन बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या सह राज्याचे लोकप्रिय कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूर जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या सत्कार प्रसंगी नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील, दादासाहेब पाटील, कारखान्याचे नूतन संचालक उदयसिंह पाटील, मनोज पाटील, सुरेश मेहेर, विलास वाघमोडे यांच्यासह सन्माननीय पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा