Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ मे, २०२६

*‘प्रहार’वर अखेरचा सत्ता-प्रहार---* *स्वतंत्र राजकारणाची हतबलता आणि लोकशाहीपुढील नवे संकट---ऍड. शीतल शामराव* *चव्हाण* *मो. 9921657346*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*



राजकारणात काही घटना वरकरणी लहान वाटतात; पण त्या खोलवर जाऊन पाहिल्या तर त्या काळाच्या प्रवाहाची दिशा दाखवणाऱ्या ठरतात. बच्चू कडू आणि त्यांचा 'प्रहार जनशक्ती पक्ष' शिवसेना-शिंदे गटात विलीन होणे ही अशीच एक घटना आहे. ही केवळ एका नेत्याची राजकीय ‘एन्ट्री’ किंवा एका पक्षाची ‘मर्जर’ स्टोरी नाही; ही घटना आजच्या राजकारणातील स्वतंत्रतेची मर्यादा, तडजोडीची अपरिहार्यता आणि लोकशाहीतील वाढती असमतोल शक्तिसंरचना उघड करणारी आहे.

बच्चू कडू यांची ओळख परंपरागत सत्तेच्या राजकारणातून तयार झालेली नाही. ती रस्त्यावरच्या आंदोलनातून, शेतकरी, कामगार, कर्मचारी, दिव्यांग यांसाठी उभ्या केलेल्या संघर्षातून निर्माण झाली. त्यांच्या आंदोलनांची पद्धत वेगळी होती. थेट, आक्रमक आणि लोकांशी जोडलेली. त्यामुळेच प्रहार ही केवळ एक संघटना किंवा पक्ष नव्हता; तो एका प्रकारचा ‘संघर्षाचा स्वभाव’ होता. महाराष्ट्राच्या गोंगाटात, मोठ्या पक्षांच्या सावलीतही हा छोटा आवाज वेगळा ऐकू येत होता.

मात्र या सगळ्या प्रक्रियेत एक मूलभूत मर्यादा होती. विचारसरणीची सुसंगत बैठक नसणे हीच ती मर्यादा. प्रहार हा भावनिक, प्रसंगाधारित आणि व्यक्तिनिष्ठ नेतृत्वावर उभा राहिलेला प्रवाह होता. त्यामुळे तो लोकांमध्ये लोकप्रिय असला तरी दीर्घकालीन राजकीय संरचनेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक, संघटनात्मक आणि आर्थिक ताकद त्याच्याकडे नव्हती. तरीदेखील, जनमानसात बच्चू कडू यांच्याबद्दल एक वेगळी सहानुभूती होती. कारण ते ‘लढणारे’ म्हणून ओळखले जात होते.

आता मात्र त्यांनी स्वतःचा पक्ष सत्ताधारी गटात विलीन करत विधान परिषद आमदारकी स्वीकारली आहे. या निर्णयावर प्रचंड टीका झाली, विशेषतः विरोधी पक्षांकडून. पण या घटनेला केवळ ‘कोणी कुणाला साथ दिली’ किंवा ‘कोण सत्तेत गेला’ या पातळीवर समजून घेणे अपुरे ठरेल. या घटनेच्या मागे एक मोठे चित्र आहे. "आजच्या राजकारणात स्वतंत्रपणे उभे राहण्याची क्षमता झपाट्याने कमी होत चालली आहे" हेच ते विदारक चित्र आहे.

आजचे राजकारण हे केवळ विचारांचे किंवा जनाधाराचे राहिलेले नाही; ते संसाधनांचे, पैशांचे, सत्तेच्या यंत्रणांचे आणि झुंडशाहीचे राजकारण झाले आहे. मोठे पक्ष केवळ निवडणुका जिंकत नाहीत; ते संपूर्ण राजकीय क्षेत्रच व्यापून टाकतात. अशा परिस्थितीत छोटे पक्ष, स्वतंत्र संघटना किंवा व्यक्तिमत्वे ही हळूहळू कडेला ढकलली जातात. त्यांच्याकडे पैसा नाही, संघटनात्मक यंत्रणा मर्यादित आहे, माध्यमांमध्ये स्थान कमी आहे आणि सत्तेचा आधार नाही. परिणामी, त्यांच्यासमोर दोनच पर्याय उरतात. एकतर लढत राहून हळूहळू निष्प्रभ होणे किंवा तडजोड करून मोठ्या सत्ताकेंद्रात विलीन होणे.

बच्चू कडू यांचा निर्णय हा या दुसऱ्या पर्यायाचा भाग आहे. ही केवळ वैयक्तिक निवड नाही; ती एका व्यापक राजकीय हतबलतेची अभिव्यक्ती आहे. जे आधी थोड्याफार तडजोडींवर टिकून होते, ते आता पूर्णपणे विलीन होण्याच्या मार्गावर आहेत. आणि जे अजूनही तडजोड करत नाहीत, ते मुख्य प्रवाहातून हद्दपार होत आहेत.

या प्रक्रियेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे समाजातील विविध प्रश्नांना आवाज देणाऱ्या मंचांची घट. शेतकरी, कामगार, दिव्यांग, सामान्य नागरिक यांच्यासाठी मधूनमधून उठणारा बच्चू कडू यांचा आक्रमक आवाज आता सत्तेच्या चौकटीत येणार आहे. सत्तेत गेल्यानंतर आवाज बदलतो, मर्यादित होतो, कधी-कधी थांबतोही. प्रहार संघटना कागदावर स्वतंत्र राहिली, तरी तिचा आत्मा, तिचा बंडखोर स्वभाव तोच राहील का, हा प्रश्न उभा राहतो.

लोकशाही केवळ मोठ्या पक्षांवर उभी राहत नाही; ती विविध आवाजांच्या, मतभिन्नतेच्या आणि संघर्षांच्या संतुलनावर उभी असते. जेव्हा हे छोटे आवाज संपतात किंवा मोठ्या सत्तेत विलीन होतात, तेव्हा लोकशाहीचे स्वरूप एकांगी होऊ लागते. संसद आणि विधानसभांमध्ये जे प्रतिनिधित्व असते, ते समाजातील सर्व स्तरांचे नसते; आणि जे आवाज आत पोहोचत नाहीत, ते बाहेर कुठेतरी वेगळ्या स्वरूपात व्यक्त होऊ लागतात.
इतिहास सांगतो की जेव्हा लोकशाही संस्थांमध्ये असंतोषाला स्थान मिळत नाही, तेव्हा तो रस्त्यावर, कधी हिंसक स्वरूपातही, बाहेर पडतो. म्हणूनच अशा घटनांकडे केवळ राजकीय ‘डील’ म्हणून पाहणे धोकादायक आहे. ही लोकशाहीच्या आरोग्याची लक्षणे आहेत आणि ती चिंताजनक आहेत.

‘प्रहार’वर झालेला हा सत्ता-प्रहार म्हणजे केवळ एका पक्षाचा शेवट नाही; तो स्वतंत्र राजकारणाच्या मर्यादांचा आणि प्रस्थापित सत्ताकेंद्रांच्या वाढत्या वर्चस्वाचा संकेत आहे. या संकेताचे गांभीर्य ओळखले नाही, तर उद्या अशाय अनेक ‘प्रहारां’नंतर उरेल ते फक्त सत्तेचे एकमुखी राजकारण आणि त्यात लोकशाहीचा आत्मा हरवलेला असेल.

आज गरज आहे ती या प्रक्रियेची चिकित्सा करण्याची, स्वतंत्र राजकारणाला बळ देण्याची आणि लोकशाहीतील विविधतेचे रक्षण करण्याची. अन्यथा, प्रत्येक छोट्या आवाजावर असा ‘सत्ता-प्रहार’ होत राहील आणि आपण केवळ प्रेक्षक बनून ते पाहत राहू.

© ऍड. शीतल शामराव चव्हाण 
(मो. 9921657346)







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा