*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
नसरापूर : (ता. भोर, जि. पुणे) येथे घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना, या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत संतप्त आणि हळहळ व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, आरोपीच्या मुलाने स्वतःच्या वडिलांविरोधात उघडपणे कठोर भूमिका घेतल्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
आरोपीच्या मुलाने माध्यमांशी बोलताना अत्यंत तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या. “मला बाप म्हणून त्याला स्वीकारण्याची लाज वाटते. माझी एकच चूक आहे की मी त्याच्या पोटी जन्मलो,” असे म्हणत त्याने आपल्या वडिलांबद्दलचा संताप व्यक्त केला. पुढे तो म्हणाला की, “सरकारने त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. त्याने केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही. त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे.”
गावात पसरत असलेल्या अफवांवरही त्याने भाष्य केले. “काही लोक माझ्याविरोधात खोट्या गोष्टी पसरवत आहेत आणि मला या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. जे काही घडलं ते अत्यंत भयानक आहे आणि त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” असे त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, आरोपीची पत्नीही माध्यमांसमोर येत संतप्त प्रतिक्रिया दिली. “त्या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे. त्याला ठेचून मारा किंवा फाशी द्या,” अशी मागणी करत तिने आरोपीशी असलेले संबंध स्पष्ट केले. “मी २०१५ पासून त्याच्यापासून वेगळी राहते. त्याच्या कृत्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्याने आमचं समाजात तोंड काळं केलं आहे,” असे ती म्हणाली.
ती पुढे म्हणाली की, “आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही जमीन विकायला काढली आहे. आम्ही त्याच्याबद्दल कधीही चौकशी केली नाही, तो कुठे आहे किंवा काय करतो हेही माहित नव्हतं. त्याच्या मृतदेहावर आमचा कोणताही हक्क नाही. त्याची बॉडी आम्हाला देऊ नका, त्याचे अंतिम संस्कारही करू नका,” अशी तीव्र भूमिका तिने मांडली.
या प्रकरणानंतर आरोपीच्या कुटुंबीयांवरही सामाजिक दबाव वाढल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या मुलाने सांगितले की, “गावातील काही लोक आम्हाला इथे राहू देणार नाहीत, असे सांगत आहेत. आम्ही कुठे जावे हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला प्रशासनाकडून अद्याप कोणतेही संरक्षण मिळालेले नाही. पोलिसांनी आमच्याशी संपर्कही साधलेला नाही,” अशी खंत त्याने व्यक्त केली




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा