इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमी वर जळालेले डीपी तात्काळ बदलून द्यावेत तसेच नवीन डीपी देखील तातडीने मंजूर करावेत अशी आग्रही मागणी सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी
दि. ८ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद बैठकीत केली. यावेळी विषय समित्यांची नुकतीच निवड झाल्यानंतर जिल्हा परिषद पुणे स्थायी समितीची आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमी वर वाढत्या तापमाना मुळे ग्रामीण भागात डीपी जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे डीपी जळाल्याचा अहवाल प्राप्त होताच तात्काळ नवीन डीपी बसवण्यात यावेत, जेणे करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा तसेच जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही या मागण्या केल्या. तसेच ज्या ठिकाणी नवीन डीपीची मागणी प्रलंबित आहे त्या सर्व ठिकाणी तातडीने मंजुरी देऊन नवीन डीपी बसवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना देखील त्यांनी संबंधित विभागाला केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती दिपाली हुलावळे, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती अमोल नलावडे, सन्माननीय सदस्य, विविध विभागांचे खातेप्रमुख तसेच महावितरण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर या सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतीसाठी आवश्यक असलेल्या खते, बियाणे व औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून अवास्तव दराने विक्री तसेच निकृष्ट दर्जाच्या साहित्याची विक्री होत असल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तपासण्यांचा आढावा घेण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील वाढत्या वीज समस्यांवरही सभेत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. भारनियमन कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, जुन्या व धोकादायक वीज पोलचे तातडीने नूतनीकरण करणे तसेच जळालेले, चोरीस गेलेले किंवा नादुरुस्त डीपी कमी कालावधीत बदलण्यासाठी सक्षम व कार्यक्षम यंत्रणा उभारण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या अपघात व आगीच्या घटनांची माहितीही सभेमध्ये मागविण्यात आली.
सभेच्या शेवटी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सदस्यांनी मांडलेल्या सर्व विषयांवर तातडीने व प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. भविष्यात प्रत्येक विभागप्रमुखाने अद्ययावत माहितीसह सभेला उपस्थित राहावे व नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिक संवेदनशीलतेने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देशही यावेळी देण्यात आले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा