Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २९ जून, २०२६

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वर्धापन दिनासाठी* *भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त एअर मार्शल बी. एन. गोखले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार*

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

सोमवार, २९ जून २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९


नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३७ वा वर्धापन दिन येत्या बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी विद्यापीठ मुख्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यास भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त एअर मार्शल बी. एन. गोखले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

विद्यापीठाच्या ३७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता प्रशासकीय इमारतीतील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन, ध्वजारोहण, राज्यगीत व विद्यापीठ गीताने होईल. त्यानंतर मुख्य अतिथी भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त एअर मार्शल बी. एन. गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम विद्यापीठ शैक्षणिक इमारतीतील सभागृहात होईल. त्यांच्या हस्ते तुळशीच्या रोपास जलार्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात येईल. यावेळी प्रास्ताविकपर भाषणात  कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे विद्यापीठ प्रगतीचा आढावा सादर करतील. 

यावेळी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात येईल तसेच त्यांच्या हस्ते विद्यापीठाचे उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट कर्मचारी व सर्वाधिक नोंदणी असलेले अभ्यासकेंद्र यांचा सन्मान करण्यात येईल. विद्यापीठाचा  ‘यश जीवन गौरव पुरस्कार’ मिळालेले  डॉ. अशोकराव कुकडे – लातूर ( वैद्यकीय सेवा), अनिल मेहेर – नारायणगाव ( कृषी व ग्रामीण विकास), प्रा. दिलीप फडके - नाशिक ( साहित्य – संस्कृती व ग्राहक संरक्षण ), डॉ. निरुपमा देशपांडे – मेळघाट, अमरावती (आदिवासी उद्योजकता व पर्यावरण) आणि सौ. सीमा मिलिंद कांबळे – पुणे (महिला सक्षमीकरण) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.  कार्यक्रमाच्या अखेरीस प्रमुख अतिथी सेवानिवृत्त एअर मार्शल बी. एन. गोखले यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल. आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा