इंदापूर, डॉ. संदेश शहा.
सोमवार, २९ जून २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
श्री करुणा मंदिर सेवा प्रतिष्ठान संचलित गोशाळा, वाई येथे रविवारी गोसेवेसोबत मुलांचे पोलिओ लसीकरण करण्याचा स्तुत्य, अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
गेली वीस वर्षांपासून ही गोशाळा कत्तलीपासून वाचवलेल्या, अंध, अपंग, आजारी, बेवारस तसेच शेतकऱ्यांनी सोडून दिलेल्या गोवंशांची अविरतपणे सेवा करत आहे. जैन बांधवांच्या विशेष सहकार्यातून व अध्यक्ष दीपचंद ओसवाल, कार्याध्यक्ष ललित गुंदेचा, संचालक राकेश ओसवाल व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य अविरतपणे सुरू आहे. या गोशाळेत कार्यरत असलेल्या गोपालक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील ५ वर्षां खालील सर्व लहान बालकांना पोलिओचे २ थेंब पाजण्यात आले. वेळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविका व डॉक्टरांच्या पथकाने गोशाळेत प्रत्यक्ष भेट देऊन हे लसीकरण पूर्ण केले.
"गोमातेची सेवा करणारे हात बळकट तरच गोसेवा अखंड चालेल. त्यामुळे गो सेवकांच्या मुलांचे आरोग्य जपणे ही गोशाळेची जबाबदारी आहे," असे मत गोशाळा प्रशासनाने व्यक्त केले.
"गोशाळा हे केवळ गाईंचे संगोपन केंद्र नसून संस्कार केंद्र आहे. येथे माणुसकीही जपली जाते," असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. गोशाळेत वर्षभर गोसेवा व संवर्धना बरोबरच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. निरोगी गोसेवक, सशक्त गोशाळा या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. इतर गोशाळांनीही आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचे लसीकरण झाले आहे का याची खात्री करावी, असे आवाहन करुणा मंदिर गोशाळेकडून करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा